गोवा राज्यात अन्य राज्यांतील वाहनांवर आकारण्यात येणाऱ्या प्रवेश कराचा तिढा सुटला नसल्याने आज गोवा सीमेवर महाराष्ट्रात वाहने अडविण्यात आली. रात्रौपर्यंत प्रवेश कराचा तिढा सुटेल, अन्यथा मध्यरात्रीपासून वाहने अडविली जातील, असे सांगण्यात आले.
गोवा राज्यात येणाऱ्या अन्य राज्यांतील वाहनांना कर आकारला जात आहे. या करातून तात्पुरत्या स्वरूपात सिंधुदुर्ग, बेळगाव, कारवार व कोल्हापूरला वगळण्यात आले होते. त्यामुळे पंधरा दिवस महाराष्ट्रातील वाहनधारक गप्प होते.
सिंधुदुर्ग, कोल्हापूर, बेळगाव व कारवार भागांतून गोवा राज्यात दैनंदिनी वाहनधारक जात-येत असतात. शिवाय जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठाही गोवा राज्यात केला जातो. त्यामुळे वाहतूकदारांच्या संघटनेने करातून वगळण्याची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर ठाम होते.
आज सकाळी गोवा राज्याच्या महाराष्ट्रातील सीमेवर वाहने अडविण्यात आली. गोवा सरकारने प्रवेश कराची सवलत द्यावी, या मागणीसाठी अचानक आंदोलन सुरू झाल्याने लग्नसराईच्या काळात लोकांची धांदल उडाली, पण सकाळी ११ वा.नंतर वाहतूक पूर्ववत करण्यात आली. गोवा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी प्रवेश कराबाबत आज मध्यरात्रीपर्यंत निर्णय घ्यावा, अन्यथा उद्या मंगळवार १४ मेपासून महाराष्ट्र-गोवा सीमेवर वाहने रोखण्याचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील वाहतूकदार संघटनांसोबत बेळगावची संघटनाही सहभागी आहे.