अंदाजपत्रकात संकेत; अनुदान, जाहिरातींच्या उत्पन्नावर गाडा हाकणार
वसई-विरार महापालिकेने आरोग्य सेवा मोफत केल्यानंतर आता परिवहन सेवा मोफत करण्याबाबत विचार सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकात मोफत प्रवासासाठी तरतूद करून ठेवण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून अनुदान घेऊन आणि जाहिरातींच्या उत्पन्नात मोफत सेवा देता येऊ शकेल का याची चाचपणी करण्यात येणार आहे.
परिवहन व्यवस्थापकांनी सादर केलेल्या २०१८-१९ च्या सुधारित अर्थसंकल्पासह २०१९-२० च्या अपेक्षित खर्च आणि उत्पन्नाच्या आकडेवारीनुसार सादर केलेल्या महापालिका उपक्रमाच्या अंदाजपत्रकावर परिवहन समितीने फेरविचार करून २०१८-१९ च्या सुधारित अंदाजपत्रकासह २०१९-२०चे अंदाजपत्रक ‘ब’ तयार करून स्थायी समितीपुढे मांडला होता. परिवहन समितीने ६० कोटी ६५ लाख रुपये किमतीचे आणि ४ कोटी २९ लाख शिलकीचे अंदाजपत्रक सादर केले आहे. त्याला स्थायी समितीने किरकोळ दुरुस्तीसह मंजुरी दिली आहे. त्यात विविध योजनांसह नागरिकांना मोफत प्रवासाची तरतूद करून ठेवण्यात आली आहे. महापालिकेच्या परिवहन सेवेच्या बसमधून दररोज सरासरी एक लाख प्रवासी प्रवास करत असतात. नालासोपाऱ्याचे आमदार क्षितिज ठाकूर यांनी नागिरकांना परिवहन सेवेच्या बसमधून मोफत बस प्रवास देण्याची संकल्पना मांडली होती. त्यामुळे परिवहन समितीने यंदाच्या अंदाजपत्रकात मोफत प्रवासासाठी एक कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. याबाबत माहिती देताना परिवहन सभापती प्रितेश पाटील यांनी सांगितले की, अशा प्रकारे हा देशातला पहिला प्रयोग असणार आहे. त्यासाठी आमचा अभ्यास सुरू आहे. सध्या पालिकेतर्फे जिल्हा परिषद शाळेच्या आठ हजार विद्यार्थ्यांना मोफत प्रवास दिला जातो, तर साडेचार हजार विद्यार्थ्यांना सवलतीच्य दरात पास दिले जातात. याशिवाय ज्येष्ठ नागरिक, अपंग आणि डायलिसिस रुग्णांना ५० टक्के सवलतीत प्रवास दिला जातो. त्यासाठी साडेतीन कोटींचा आर्थिक भार सहन करावा लागतो.
नागरिकांना मोफत प्रवास देण्यासाठी काय करता येईल त्याच्यावर विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारकडून काही निधी मिळेल का आणि जाहिरातीतून काही उत्पन्न मिळेल आणि हा प्रवास देता येईल का याचा अभ्यास सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.
स्थायीच्या बैठकीत मोफत प्रवासाऐवजी विनातिकीट हा शब्दप्रयोग करून या अंदाजपत्रकाला मंजुरी देण्यात आल्याची माहिती स्थायी समिती सभापती सुदेश चौधरी यांनी दिली.
परिवहन अंदाजपत्रकाची वैशिष्टय़े
* मोफत बस प्रवासासाठी तरतूद
* विरारच्या यशवंतनगर येथे परिवहन भवनाच्या वाढीव बांधकामासाठी ४० कोटींची तरतूद
* नवीन २० बस खरेदीसाठी १० कोटींची तरतूद
२० नव्या बसगाडय़ा
महापालिकेची परिवहन सेवा ३ ऑक्टोबर २०१२ पासून बुम पद्धतीने मानधन तत्त्वावर सुरू आहे. सध्या परिवहन सेवेमध्ये १४९ बस आहेत. पालिकेला प्रति बस १ हजारप्रमाणे मानधन मिळते. ११९ बस या पालिकेच्या असून त्यापोटी पालिकेला वर्षांला १ लाख १९ हजार रुपये मानधन मिळत आहे. केंद्र सरकारकडून जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत पालिकेच्या ताफ्यात ३० बस दाखल झाल्या. त्याचे प्रति बस अडीच हजार रुपये याप्रमाणे पालिकेला १० लाख १९ हजार रुपयांचे मानधन मिळते.आणखी २० नवीन बस येणार आहेत. त्यापोटी पालिकेला २० हजार रुपयांचे वार्षिक उत्पन्न मिळणार आहे.