हार्बरवरील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वे प्रवासही कसरतीचा
अलिबाग/रत्नागिरी/मुंबई : Ganesh ustav in kokan गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांपुढे यंदाही प्रवासविघ्न उभे ठाकले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांत मिळून सुमारे ८० किलोमीटर रस्त्यावर एक मार्गिकाही पूर्ण झालेली नसून, खड्डे कायम असल्याने कोकणात निघालेल्या गणेशभक्तांना कसरत करावी लागत आहे. दुसरीकडे, ऐन गणेशोत्सवात हार्बर मार्गावर रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आल्याने पनवेल स्थानकातून रात्री कोकणात धावणाऱ्या गाडय़ा पकडण्यासाठी जाणाऱ्या प्रवाशांचे हाल सुरू आहेत.
गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाचा पाठपुरावा केला असला तरी त्यात पूर्ण यश आलेले नाही. रायगड जिल्ह्यात हे काम पाच टप्प्यांत चालू आहे. मात्र, कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील कामाला अपेक्षित गती मिळू शकलेली नाही. त्यामुळे जिल्ह्यात सर्वाधिक खराब रस्ता याच टप्प्यात आहे. एकूण ४२ किलोमीटर लांबीच्या या टप्प्यातील केवळ ६ किलोमीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे.
इंदापूर ते वडपालेदरम्यान महामार्गाच्या तिसऱ्या टप्प्यातील कामे चालू आहेत. तिथे २५ किलोमीटरपैकी १४ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. पळस्पे ते कासू या ४२ किलोमीटर लांबीच्या पहिल्या टप्प्यापैकी गोव्याकडील मार्गिकेचे ३९ किलोमीटरचे काम पूर्ण झाले आहे. तीन किलोमीटरचे काम शिल्लक असून, यात प्रामुख्याने पुलांच्या कामांचा समावेश आहे. महामार्ग यंत्रणांनी सध्या गोवा मार्गिकेवर लक्ष केंद्रीत केल्याने, दोन्ही बाजूची वाहतूक सध्या मुंबई मार्गिकेवरून सुरू आहे. वाहतुकीचा ताण वाढल्याने या मार्गिकेची मोठय़ा प्रमाणात दुरवस्था झाली असून, त्या मार्गिकेच्या दुरुस्तीकडे प्रशासनाने लक्ष दिलेले नसल्याने गणेशभक्तांचा परतीचा प्रवासही खडतर ठरण्याची चिन्हे आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या ६ तालुक्यांमधून जाणाऱ्या या महामार्गापैकी खेड आणि चिपळूण तालुक्यातील एका मार्गिकेचे काम बऱ्यापैकी पूर्ण झाले आहे. विशेषत: कशेडी घाटाला पर्यायी म्हणून काढलेल्या बोगद्यातून एक मार्गिका सुरू झाल्याने हलक्या वाहनांमधून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. पण, सुरक्षिततेचा उपाय म्हणून एसटी बसगाडय़ा आणि खासगी आरामगाडय़ांना जुन्या घाटातून यावे लागेल, असे सूतोवाच मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले आहे. त्यामुळे गणेशोत्सवकाळात बोगद्याच्या शेवटाकडे दोन्ही बाजूंनी मोठय़ा संख्येने येणाऱ्या वाहनांमुळे कोंडी होण्याची शक्यता आहे.
कशेडी ते परशुराम घाट या टप्प्यात एका मार्गिकेचे काम ९० टक्के झाले आहे. परंतु, रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे आहेत. खेड-चिपळूण रस्त्यावर परशुराम घाटात डोंगरकटाईचे काम झाले आहे. मात्र, पावसामुळे डोंगरात झरे प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे दरड कोसळण्याचा धोका कायम आहे. परशुराम ते चिपळूणपर्यंत अनेक ठिकाणी डांबरी मार्गावर मोठे खड्डे पडले आहेत. पेढे गावाजवळून जाणाऱ्या चौपदरीकरणाचे काम, चिपळूण शहरामधून जाणाऱ्या महामार्गाचे सेवा रस्ते आणि बहादुर शेख नाका येथील उड्डाणपुलाचे काम बाकी आहे. त्यामुळे मुंबईकडून परशुराम घाट उतरून आल्यावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
आरवली ते वाकेड या टप्प्यातील आरवली ते संगमेश्वर शहरापर्यंत सुमारे १८ किलोमीटर लांबीच्या एका मार्गिकेचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाले आहे. पण तेथून रत्नागिरी आणि लांजा या तालुक्यांमधून जाणाऱ्या या महामार्गापैकी एकूण सुमारे ४० किलोमीटरचे काम बाकी आहे. त्याचबरोबर, आरवली, संगमेश्वर, बावनदी येथे जुन्याच पुलांचा वापर करावा लागणार आहे. लांज्यापासून पुढे मात्र चौपदरीकरणाचे काम जवळपास पूर्ण झाले असले तरी तिथपर्यंत येण्यासाठी अडथळय़ांची शर्यत पार करावी लागत आहे.
रेल्वे प्रवासातही अडचणी
रस्ते वाहतुकीबरोबरच रेल्वे वाहतुकीतही गणेशभक्तांना गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. हार्बर आणि ट्रान्सहार्बर मार्गावरील रात्री उशिरा आणि पहाटे धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेगाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे पनवेल स्थानकातून कोकणात धावणाऱ्या विशेष रेल्वेगाडय़ा पकडण्यासाठी गणेशभक्तांना कसरत करावी आहे. गुरुवारी रात्री कोकणात जाणाऱ्या बहुतांश प्रवाशांनी पनवेल गाठण्यासाठी दोन तास आधीच प्रवासाला सुरुवात केली. कुर्ला आणि ठाणे स्थानकातून पनवेलसाठी निघालेल्या प्रवाशांच्या त्रासात भर पडली. हार्बर मार्गावर गाडय़ांचा गोंधळ नेहमीचाच आहे. त्यात आता रात्री ब्लॉक घेण्यात आला आहे.
ऐन गणेशोत्सव काळात उपनगरी रेल्वेगाडय़ा रद्द करण्याचा रेल्वेचा निर्णय आमच्यासाठी खर्चिक ठरला आहे, अशी प्रतिक्रिया ठाण्यात राहणाऱ्या भालचंद्र तेलंग यांनी दिली. रात्री उशिरापर्यंत धावणाऱ्या रद्द झाल्याने दोन तास आधीच पनवेल स्थानक गाठावे लागल्याचे रिद्धी पांगम यांनी सांगितले. सीएसएमटीवरून सुटणारी शेवटची गाडी १०.५८ची आहे. ठाण्यातून सुटणारी शेवटची गाडी ११.३२ची आहे. या गाडय़ा पकडण्यासाठी शुक्रवारी रात्री घाई करावी लागली. परंतु, बरेच कोकणवासीय हे कार्यालयातील कामे आटोपून रात्री उशिराची गाडी पकडतात. त्यांना मात्र बेलापूपर्यंतच सेवा मिळाली. तिथून पुढे जाण्यासाठी अनेकांनी रिक्षा वा एनएमएमटी बसगाडय़ांचा पर्याय निवडला.
मुंबई-चिपी विमान फेरी अचानक रद्द
अलायन्स एअरचे मुंबई-चिपी विमान गुरुवारी अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांचे हाल झाले. मुंबई विमानतळावरून ११.३० वाजता हे विमान सिंधुदुर्गातील चिपीसाठी सुटणार होते. विमानात ५२ प्रवासी आसनस्थही झाले होते. मात्र, हे विमान अचानक रद्द करण्यात आल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला. विमान रद्द करण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.
पथकर माफीचा दिलासा
मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना यंदाही राज्य शासनाने सर्व प्रवेशद्वारांवर पथकर माफी जाहीर केली आहे. १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर कालावधीत ही सवलत लागू करण्याबाबतचा शासननिर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. मुंबई-बंगळूरु आणि मुंबई-गोवा या दोन राष्ट्रीय महामार्गानी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना ‘गणेशोत्सव २०२३ कोकण दर्शन’ अशा आशयाच्या प्रवेशिका वाहनावर चिकटविल्यानंतर हा प्रवास मोफत होणार आहे.