राज्यात गेल्या वर्षांत महसूल खात्याला पोलीस खात्याने लाचखोरीमध्ये मागे टाकत अव्वल नंबर पटकावला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गेल्या वर्षी लाच घेताना १२९ गुन्ह्य़ात १६७ पोलिसांना रंगेहात पकडले असून त्यांच्याकडून १६ लाख ८३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
राज्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०११ च्या तुलनेत  २०१२ मध्ये शासनाच्या सेवेत असणारे लाचखोर अधिकारी व कर्मचाऱ्यांवर चांगली कारवाई केली आहे. गेल्या वर्षांत लाचखोरीचे एकूण ४८९ गुन्हे दाखल करून ६३२ जणांस अटक केली आहे. त्यांच्याकडून ८० लाख ४० हजार रुपये लाच म्हणून स्वीकारताना जप्त केले आहेत. २०११ मध्ये ४३७ गुन्हे दाखल करून ५६२ जणांस अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून ५२ लाख ५९ हजार लाचेची रक्कम जप्त करण्यात आली होती. २०१२ मध्ये १६७ पोलीस, महसूल खात्यातील ११८ कर्मचारी व अधिकारी, महावितरणमधील ३०, महापालिका ३२, पंचायत समिती ४०, आरटीओ २०, वनविभाग १८, शिक्षण १७, सहकार १७, जिल्हा परिषद २८, लॅन्ड रेकॉर्ड खात्यातील २५ जणांस अटक करण्यात आली आहे.
राज्यात गेल्या वर्षीपर्यंत लाच घेताना पकडण्यात आलेल्यांची संख्या ही महसूल खात्यातील अधिक होती. मात्र, २०१२ मध्ये पोलीस खात्याने महसूल खात्याला मागे टाकले आहे. पोलीस खात्यात लाच घेताना १२७ गुन्हे दाखल करून १६७ पोलिसांना अटक केली आहे. त्यांच्याकडून १६ लाख ८३ हजार रुपये जप्त करण्यात आले आहेत.
राज्यात लाच घेताना वर्ग एक (क्लास वन)च्या ४९ अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून १८ लाख २३ हजार रुपये जप्त केले आहेत. वर्ग एक मधील अटक केलेल्या अधिकाऱ्यात पोलीस खात्यातील १६ जणांचा समावेश आहे. पोलीस खात्यामध्ये गेल्या वर्षी वर्ग दोनचे सात, तीनचे १३२ जणांस अटक करण्यात आली आहे.  
शिक्षा होण्याचे प्रमाण २४ टक्के
लाचखोरीच्या गुन्ह्य़ात शिक्षा होण्याच्या प्रमाणात यंदा म्हणावी अशी वाढ झालेली नाही. २०११ मध्ये लाचखोरीच्या गुन्ह्य़ात शिक्षा होण्याचे प्रमाण २३ टक्के होते. त्यात २०१२ मध्ये फक्त एका टक्क्य़ाने वाढ झाली आहे. २०१२ मध्ये लाचखोरीच्या ४९४ गुन्ह्य़ांचा निकाल लागला. त्यामध्ये ११८ गुन्ह्य़ातील आरोपींना शिक्षा झाली, तर ३७६ गुन्ह्य़ातील आरोपी निर्दोष सुटले आहेत.  राज्यातील आठ विभागांमध्ये पुणे विभागात (४० टक्के) शिक्षा होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून आले आहे.

Story img Loader