प्रकृतीचा अहवाल देण्याचे न्यायालयाचे आदेश
समृध्द जीवन या चिटफंड कंपनीचा मालक महेश मोतेवारची गुरुवारी पोलीस कोठडी संपण्यापूर्वी त्याच्या छातीत दुखत असल्याने त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. त्यामुळे गुरुवारी उमरगा येथील न्यायालयात त्यास हजर करणे पोलिसांना शक्य झाले नाही. न्यायालयाने मोतेवारवर पुणे येथील ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून प्रत्येक १२-१२ तासांचा वैद्यकीय उपचार व प्रकृतीतील सुधारणेचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत.
गुरुवारी मोतेवारची पोलीस कोठडी संपत असतानाच सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मोतेवारला पोलीस न्यायालयात हजर करू शकले नाहीत. तशा प्रकारचे वैद्यकीय अधिकाऱ्याचे पत्र पोलिसांनी न्यायालयात सादर केले. न्यायालयाने उस्मानाबाद येथे का उपचार केले नाही, असे विचारले असता, उस्मानाबादच्या शासकीय रुग्णालयात इसीजीची सोय आहे. हृदयरोगासंबंधी अधिक उपचारासाठी सोलापूर येथील रुग्णालयात त्याला दाखल केल्याचे पोलिसांनी सांगितले. न्यायालयाने आरोपीला सोलापूर येथील शल्यचिकित्सकांच्या निगराणीखाली उपचार करावेत, असे आदेश दिले होते. मात्र, काही वेळाने मोतेवारची प्रकृती खराब झाल्याने त्याला पुणे येथील ससूनमध्ये पुढील उपचारासाठी नेल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास पोलीस व बचावपक्षाने आणून दिले. तेव्हा न्यायालयाने पुणे येथे नेण्यास परवानगी देऊन प्रत्येक १२-१२ तासांत मोतेवारवर होणारे उपचार आणि त्याच्या प्रकृती सुधारणेचा अहवाल न्यायालयास सादर करण्याचे आदेश दिले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा