एखाद्याचा वाढदिवस साजरा करणे ही संकल्पना काही नवीन नाही. राजकीय नेत्यांचा वाढदिवस तर दर वर्षी धुमधडाक्यात साजरा होत असतो. यासाठी सार्वजनिक मोक्याच्या जागी भव्य फलक हे ठरलेलेच असतात. तसेच एखादा जीवापाड प्रेम असलेल्या जनावरांचाही वाढदिवस उत्साहाने साजरा करतो. मात्र एखादे झाड अन् तेही स्वत जोपासलेले. अशा झाडाचा वाढदिवस साजरा करून वृक्ष लागवडीचा अनोखा संदेश मिरज तालुक्यातील बेडगेच्या एका शेतकऱ्याने दिला.
तसा पिंपळाचे झाड कधीही कोठेही रुजू शकत असले तरी त्याचे संगोपन करण्याची कल्पना सामान्य लोक वेडय़ात काढणारीच ठरते. कारण या झाडापासून ना कोणते फळ मिळते, ना याचा लाकडाचा लाभ. मात्र, याच वृक्षातून वर्षांला हजारो टन प्राणवायू आणि तोही फुकट मिळतो याकडे मात्र दुर्लक्ष केले जाते.
मिरज तालुक्यातील बेडग या गावी राहणारे अर्जुन सन्नके यांनी घरासमोर आलेले पिंपळाचे झाड जतन केले. त्याला पाणी घालून वाढविले. आता हे झाड तीन पुरुष उंचीचे झाले असून रविवारी याचा पाचवा वाढदिवस साजरा करण्यात आला. अगदी झाडाला फुगे बांधले, रांगोळी काढली, पंचारतीने ओवाळले आणि मित्रमंडळी आणि नातलगांच्या साक्षीने केक कापून झाडाला तुम जियो हजारो साल, साल के दिन हो पचास हजार असे म्हणत हॅपी बर्थ डेच्या शुभेच्छाही दिल्या. या वेळी वनपाल विष्णु ओमासे, बाबुराव खाडे, रवींद्र कांबळे, संजय गोसावी, वैभव वाघमोडे, देवदास कांबळे, जयपाल अंकलखोपे, सुनील नागरगोजे आदी उपस्थित होते.