नारायण राणे यांच्या प्रतिष्ठेची नगरपंचायत
कणकवली नगरपंचायत निवडणूक लवकरच घोषित होणार असल्याने काँग्रेस नेते, उद्योगमंत्री नारायण राणे यांनी बांधणी सुरू केली आहे. नारायण राणे यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरणार असल्याने राणे यांनी मित्र पक्षाच्या कट्टर प्रतिस्पर्धाला गळ टाकला असून त्याला लाल दिव्याची गाडी देण्याची तयारी दर्शविली असल्याचे बोलले जात आहे.
उद्योगमंत्री तथा पालकमंत्री नारायण राणे यांचे निवासस्थान व कर्मभूमी असणाऱ्या कणकवली नगरपंचायतीची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे. नारायण राणे यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. राष्ट्रवादी, भाजपाची ताकद या ठिकाणी नाही, हे दाखविण्याची वेळ या निवडणुकीत आली असल्याने राणे यांनी बांधणी सुरू केली आहे.
कणकवली नगरपंचायत निर्मिती वेळी राणे यांच्याकडे राज्याचे मंत्रिपद असूनही त्या वेळी संदेश पारकर व सहकाऱ्यांनी नगरपंचायतीत सत्ता मिळविली होती. राणे यांचे कट्टर प्रतिस्पर्धी व विरोधक म्हणून ओळखले जाणारे राष्ट्रवादीचे युवा नेते संदेश पारकर गेले काही दिवस राष्ट्रवादीपासून दुरावले आहेत. ते राणे यांच्या संपर्कात आहेत असे बोलले जात आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांना कणकवलीने प्रतिष्ठा मिळवून दिली म्हणून तेथील नगर परिषद निवडणुकीत समर्थकांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत: जुळवाजुळवी करत आहेत. राष्ट्रवादीचे युवा नेते संदेश पारकर यांना काँग्रेसने ऑफर दिली असून, त्यांचा काँग्रेस प्रवेश घेऊन लाल दिव्याची गाडी देण्याचा विचार चालविला असल्याचे बोलले जात आहे. गेले चार महिने संदेश पारकर यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्या विरोधात नाराजी व्यक्त करूनही राष्ट्रवादीने दखल घेतली नसल्याने ते नाराज आहेत.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पटत नाही, कायमच राणे समर्थक राष्ट्रवादीचा दुजाभाव करतात तसेच राणे आघाडी शासनात असूनही प्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याने दोन्ही पक्षात हाडवैर आहे. त्यामुळे लोकसभा, विधानसभा, विधान परिषद निवडणुका वगळता सर्व निवडणुकात दोन्ही काँग्रेस स्वबळावर निवडणुका लढवितात. त्यामुळे राष्ट्रवादीला कायमच राणे धक्कातंत्राने गर्भगळीत करत आले आहेत.
कणकवली भाजपा आमदार प्रमोद जठार आहेत. त्यांना तसेच राष्ट्रवादीला किंवा शिवसेनेला नगरपंचायतीत संधी द्यायची नाही अशा भावनेने काँग्रेसने पावले टाकली आहेत. जिल्ह्य़ातील राष्ट्रवादीला काँग्रेसने कायमच दुय्यम दर्जाची वागणूक दिल्याची तक्रार राष्ट्रवादीची सातत्याने राहिली आहे.
उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या कणकवलीतील हालचालीची दखल कणकवलीवासीयांसोबत राजकीय पक्षांनीही घेतली आहे.

Story img Loader