आदिवासींना देण्यात येणारे खावटी कर्ज दुप्पट करण्यात आले आहे. तसेच आदिवासींच्या सामूहिक विवाह सोहळ्यात देण्यात येणारे अनुदान दहा हजारांवरून २५ हजार रुपये करण्याची घोषणा आदिवासी विकास मंत्री बबन पाचपुते यांनी तालुक्यातील वैजापूर येथे आयोजित आदिवासी मेळाव्यात केली.
यावल प्रकल्पांतर्गत या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मेळाव्यातच न्युक्लिअस योजनेतून साहित्याचे वाटप पाचपुते यांच्या हस्ते करण्यात आले.
अध्यक्षस्थानी पालकमंत्री गुलाबराव देवकर होते. याप्रसंगी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, आ. जगदीश वळवी, प्रा. दिलीप सोनवणे उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्पाधिकारी डी. एल. सोनवणे यांनी केले. पारंपरिक आदिवासी नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. वैजापूरच्या शासकीय कन्या आश्रमशाळेसाठी नवीन इमारत उभारणीसाठी ४५ कोटीचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाने आदिवासी विकास मंत्रालयाला पाठविला आहे. त्यासाठी दहा कोटींचा निधी जागीच मंजूर केल्याची घोषणा पाचपुते यांनी केली. आश्रमशाळेच्या मुख्याध्यापकांवर त्यांनी ताशेरे ओढले.
आदिवासींना अतिक्रमित जमिनीचे पट्टे बहाल केल्यानंतर सपाटीकरणाकरिता व शेतीसाठी लागणारे साहित्य दिले जाणार आहे. त्यासाठी केंद्राकडे ५०० कोटींचा प्रस्ताव देण्यात आला आहे. तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना हवाईसुंदरी व हॉटेल मॅनेजमेंटसारख्या अभ्यासक्रमाचा लाभ मिळावा म्हणून पाच कोटींचा निधी दिला जाणार आहे. वैजापूर परिसरात चालक व पोलीस प्रशिक्षण केंद्र सुरू करणार असल्याची ग्वाही पाचपुते यांनी दिली.
आ. जगदीश वळवी यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमुळे आदिवासींना वन जमिनीचे पट्टे मिळाल्याचे सांगितले. आदिवासी भागात रस्ते, आरोग्य, पाणी व शिक्षणासाठी वाढीव निधी देण्याची मागणी केली. गुजराथी यांनी धुळे-खरगोन हा आंतरराज्य महामार्ग होण्यासाठी मध्य प्रदेश सरकारकडे प्रयत्न करण्याची सूचना केली. पालकमंत्री देवकर यांनीही मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन सहाय्यक प्रकल्प अधिकारी ए. डी. माळी यांनी केले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा