रमेश पाटील

सवरा पाडय़ातील रहिवाशांकडून खड्डय़ातील गढूळ पाण्याचा वापर

यंदा मार्च महिन्यातच पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाडय़ांवर पाणीटंचाई जाणवू लागली आहे. वाडा शहराजवळ असलेल्या सवरा पाडा या आदिवासी पाडय़ातील रहिवाशांना तर पाण्याचा स्रोत नसल्याने आटलेल्या विहिरीतील गढूळ पाण्यावर त्यांना गुजराण करावी लागत आहे. दूषित पाणी प्यायल्याने त्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

सवरा पाडा हा आदिवासी पाडा वाडा शहरातच येत आहे. पूर्वी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायत होऊनही येथील रहिवाशांच्या पिण्याच्या पाण्याकडे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष दिले नाही.

वाडा-उमरोठे रस्त्यावरील आदिवासी वसतिगृहामागे सवरा पाडा असून या पाडय़ात १४ ते १५ कुटुंब वास्तव्यास आहेत. ६५ ते ७५ लोकवस्तीचा हा पाडा आहे. हा वाडा शहराचाच भाग असून प्रभाग क्रमांक ८ मध्ये हा पाडा येतो. शहराचा भाग असला तरी मूलभूत सुविधा मिळाव्यात म्हणून येथील आदिवासी अनेक वष्रे झगडत आहेत. या पाडय़ावर जायला रस्ता नाही. त्यामुळे त्यांना पायवाटेने ये-जा करावी लागते. पावसाळ्यात तर चिखल तुडवत जावे लागते, तसेच येथे पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने एका पडक्या विहिरीतील पाणी रहिवासी वापरत आहेत. आता विहिरीतील पाणी आटू लागल्याने विहिरीतच छोटा खड्डा खोदून येथील रहिवासी पाणी पिण्यासाठी व इतर कामांसाठी वापरत आहेत. पूर्वी ग्रामपंचायत आणि आता नगरपंचायतीकडे शुद्ध पाणी मिळावे म्हणून अनेक वेळा अर्ज-विनंत्या केल्या. मात्र येथील प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचा आरोप येथील वयोवृद्ध महिला यमुना पागी यांनी केला.

सवरा पाडय़ातील रहिवाशांसाठी रस्ता व शुद्ध पाणी मिळावे यासाठी प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहोत. मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

– अनंता वनगा, सामाजिक कार्यकर्ता, वाडा.

सवरापाडा येथील पिण्याच्या पाण्याची गंभीर दखल घेऊन गेल्या १५ ते २० दिवसांपासून टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.

– गीतांजली कोळेकर, नगराध्यक्षा, नगरपंचायत, वाडा