ग्रामस्थांवर हल्ला, वाहनांची जाळपोळ
नाशिक : दुष्काळावर मात करण्यासाठी पावसाचे पाणी अडविण्याकरिता पाणी फाऊंडेशनच्या पुढाकारातून वन जमिनीवर राबविल्या जाणाऱ्या श्रमदान मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांवर शुक्रवारी सकाळी आदिवासींच्या जमावाने चांदवड तालुक्यातील मतेवाडी शिवारात हल्ला केला. यावेळी गलोर, गोफणीच्या सहाय्याने दगडांचा वर्षांव झाल्याने सात जण जखमी झाले. संतप्त जमावाने दुचाकी पेटवत जेसीबीसह काही वाहनांची तोडफोड केली. या घटनेमुळे काम थांबविण्यात आले आहे.
मतेवाडी गावात २६ एप्रिलपासून पाणी फाऊंडेशनच्यावतीने जलसंधारणाचे काम हाती घेण्यात आले आहे. वन विभागाच्या जमिनीवर चाललेल्या या कामास जमीन कसणाऱ्या आदिवासींचा विरोध आहे. पहिल्या दिवशीही यावरून वाद झाला. तेव्हां ग्रामस्थांनी मध्यस्थी करत आदिवासी जी जमीन कसतात, ती वगळून काम करण्याचे ठरवले. त्यानुसार जेसीबी यंत्र आणि श्रमदानाच्या सहाय्याने शांतपणे काम पुढे सरकत असतांना या कामास शुक्रवारी हिंसक वळण लागले.
सकाळी नेहमीप्रमाणे श्रमदानाच्या कामाला सुरूवात झाल्यावर आदिवासींचा जमाव धडकला. त्यांनी कामाला विरोध करत श्रमदान करणाऱ्यांवर गोफण, गलोरीच्या सहाय्याने दगडफेक सुरू केली. अकस्मात झालेल्या हल्ल्यामुळे एकच धावपळ उडाली. संतप्त जमावाने काही दुचाकी जाळल्या. जेसीबीसह इतर वाहनांची तोडफोड केली. जमावाच्या हल्ल्यात भाऊराव चव्हाण, जिजाबाई चव्हाण, सुरेखा मते, संतोष मते, सागर कावळे, प्रमोद मोटू, मुन्ना शहा हे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, वडनेरभैरवचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांसह धाव घेतली. तोपर्यंत धुडगूस घालणारे अनेक जण पसार झाले होते. दगडफेकीत गावातील पाच आणि जेसीबीचे दोन चालक असे एकूण सात जण जखमी झाल्याची माहिती चांदवडचे तहसीलदार प्रदीप पाटील यांनी दिली.
या घटनेमुळे परिसरात तणाव असून जखमींना उपचारार्थ चांदवडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अकस्मात वादाचे कारण काय?
दरम्यान अकस्मात वाद उफाळून येण्यामागील कारण शोधण्याचे काम यंत्रणेने सुरू केले अहे. आपण जी जमीन कसतो, तिथे काम करण्यास आदिवासींचा विरोध होता. पहिल्या दिवशी झालेल्या वादावेळी एका आदिवासी महिलेला मारहाण झाल्याची माहिती चर्चेतून पुढे आली. मतेवाडी, शिवाजीनगर भागात ग्रामस्थ आणि आदिवासी यांच्यात याआधी कोणतेही वाद नाहीत. त्या दिवशी सर्व वाद मिटून कामाला सुरूवात झाली होती. काही दिवसांनी ही घटना घडली. हल्ला चढविणारा जमाव बाहेरून गावात आल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. खबरदारीचा उपाय म्हणून गावात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. वन विभागाने वन जमिनीवरील काम तूर्तास थांबविण्याची सूचना केल्याचे तहसीलदारांनी सांगितले. या घटनेमुळे पाणी फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांमध्ये भीती पसरली आहे.