कर्जतमधील तमनाथ आणि रामाची वाडी हागणदारी मुक्त
देशभरात स्वच्छ भारत मिशनची जोरात सुरुवात करण्यात आली आहे. जाहिरातींच्या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्व सांगितले जात आहे. याचे सकारात्मक परिणाम आता दिसण्यास सुरुवात झाली आहे. रायगड जिल्ह्य़ातील शिरसे ग्रामपंचायतीतील तमनाथ आदिवासी वाडी १०० टक्के हागणदारी मुक्त झाली आहे. त्यामुळे आदिवासी घटकांपर्यंत स्वच्छतेबाबत जागृती निर्माण होत असल्याचे आशादायक चित्र निर्माण झाले आहे.
स्वच्छता ही एक सामुदायिक जबाबदारी आहे, याची जाणिव लोकांना होणार नाही तोवर स्वच्छ भारतचे स्वप्न साकार होणार नाही. ही बाब लक्षात घेऊन सध्या स्वच्छतेबाबत व्यापक जनजागृती केली जात आहे. दुरचित्रवाहिन्यांवरील जाहिराती, गावबठका, ग्रामसभा, संपर्क अभियान या माध्यमातून लोकांना स्वच्छतेचे महत्व पटवून दिले जात आहे. याचे सकारात्मक परिणाम दिसण्यास आता सुरुवात झाली आहे.
आदिवासी घटकातही वैयक्तीक स्वच्छतेबरोबर परिसर स्वच्छतेबाबत जाणिव निर्माण होत असल्याचे आशादायक चित्र पाहायला मिळत आहे. कर्जत तालुक्यातील तामनाथ आदिवासी वाडी ही रायगड जिल्ह्य़ातील १०० टक्के हागणदारी मुक्त होणारी पहिली आदिवासीवाडी ठरली आहे. शिरसे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच रतन गोपाळ वाघमारे यांनी आदिवासी वाडीत हा क्रांतीकारी बदल घडवून आणला आहे.
रतन वाघमारे या स्वत: आदिवासी समाजाच्या असून त्या याच आदिवासी वाडीच्या रहिवाशी आहेत. स्वच्छतेचे महत्व जाणून त्यांनी गावात हा निर्मल अभियान राबवण्याचा निर्णय घेतला. वाडीतील प्रत्येक घरात जाऊन त्यांनी गावातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. वैयक्तिक आणि परिसर स्वच्छतेचे महत्व वाडीतील लोकांना पटवून दिले, चांगल्या आरोग्यासाठी प्रत्येकाने शौचालय बांधण्याचे आवाहन केले. त्यासाठी लागणारे गवंडी कामाचे प्रशिक्षण उपलब्ध करून दिले. आदिवासी बांधवांनी सरपंच वाघमारे यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद दिला. वाडीतील ३९ कुटुंबांपकी ३३ कुटुंबांनी वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले. उर्वरीत कुटुंबही आता उघडय़ावर शौचाला जात नाही. ते सार्वजनीक शौचालयाचे वापर करू लागले. त्यामुळे तमनाथ आदिवासी वाडी ही शंभर टक्के हागणदारी मुक्त झाली. स्वच्छ भारत मिशनच्या सकारात्मक परिणामांचे हे द्योतक आहे.
तमनाथ आदिवासी वाडीचा आदर्श घेऊन आता कर्जत तालुक्यातील आणखिन एक आदिवासी वाडी निर्मल झाली आहे. ग्रामपंचायत बोरविली मधील रामाची वाडी ही आदिवासी वाडी आता १०० टक्के हागणदारी मुक्त झाली आहे. वाडीतील परिसर स्वच्छता, एकाच रंगाची आणि एकाच पद्धतीची शौचालये ही गावाची ओळख बनली आहे. जिल्हाधिकारी शितल उगले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश गोटे यांनी आदिवासी वाडीच्या या कार्याची दखल घेऊल कौतुकाची थाप दिली आहे.
आदिवासी घटकापर्यंत स्वच्छतेचे महत्व पोहचत असल्याचे हे द्योतक आहे. ही सुरुवात आहे. अजुनही बरेच काम होणे बाकी आहे. मात्र तमनाथ आणि रामाचीवाडी या आदिवासी वाडय़ांच्या हा स्वच्छता पॅटर्न जिल्ह्य़ातील इतर आदिवासी वाडय़ा आणि गावांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.
रायगड जिल्ह्य़ातील कर्जत, खालापुर, सुधागड, पेण हे तालुके आदिवासी बहूल तालुके मानले जातात. त्यामुळे आगामी काळात या सर्व तालुक्यात स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहे. यासाठी तमनाथ आणि रामाचीवाडी या आदिवासी वाडय़ा मार्गदर्शकाची भुमिका बजावतील यात शंका नाही.
येत्या तीन ते चार वर्षांत रायगड जिल्हा हागणदारी मुक्त करण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र यासाठी लोकांचा सक्रीय सहभाग गरजेचा असणार आहे. स्वच्छ रायगड अभियाना अंतर्गत कुटूंबस्तर संवाद अभियान सध्या राबवण्यात येत आहे. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला भेट देऊन शौचालय बांधण्यासाठी प्रवृत्त केले जाणार आहे. तमनाथ आणि रामाची वाडीने केलेल काम यावेळी लोकांना दाखवले जाईल. अशी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अविनाश गोटे यांनी सांगीतले.