सुरगाणा तालुक्यातील आश्रमशाळेत इयत्ता बारावीच्या आदिवासी विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या प्रकरणातील चार संशयितांची न्यायालयाने ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत रवानगी केली. या विषयात दाखविलेल्या हलगर्जीपणामुळे पळसनच्या शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापकास निलंबित करण्यात आले. दरम्यान, आदिवासी विद्यार्थीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण ताजे असताना देवळाली कॅम्प भागात आदिवासी महिलेवर बलात्काराचा आणखी एक प्रकार पुढे आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी संशयित शेतकऱ्यास अटक करण्यात आली आहे.
सुरगाणा तालुक्यातील पळसन गावातील बारावीच्या विद्यार्थिनीवर झालेल्या बलात्कार प्रकरणी पोलिसांनी दिनकर गांगुर्डे (२४), पांडुरंग वाघमारे (१८), सुरेश सोनू पवार (२२) आणि सावळीराम निकुळे (२१) यांना अटक करण्यात आली.
संशयितांना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना ७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चा काढून दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. बलात्कारासारखा गंभीर प्रकार घडूनही मुख्याध्यापकांनी कोणतीही तक्रार पोलिसात दाखल केली नाही. या प्रकरणात दाखविलेल्या हलगर्जीपणावरून कळवण आदिवासी प्रकल्प कार्यालयाने देवरे यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला. आश्रमशाळेतील विद्यार्थी व प्रामुख्याने विद्यार्थिनी धास्तावल्या आहेत.
दरम्यान, ही घटना ताजी असताना गुरूवारी रात्री शहरालगतच्या वंजारवाडी भागात एका शेतकऱ्याने आदिवासी महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघड झाली. वंजारवाडी येथे कैलास देवराम शिंदेने रात्री साडे नऊच्या सुमारास एका घरात बळजबरीने प्रवेश करून महिलेवर बलात्कार केला. याचवेळी संबंधित महिलेचा पती घरात आल्यानंतर त्याला हा प्रकार लक्षात आला. शुक्रवारी सकाळी संबंधितांनी स्थानिक नेत्याच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांची भेट घेऊन हा प्रकार कथन केला. त्यानंतर पोलिसांनी तातडीने चक्रे फिरवून शिंदेला अटक केली. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tribal student raped hostel principal dismissed