नंदुरबार : संशयास्पद मृतावस्थेत आढळलेल्या आदिवासी महिलेचा मृतदेह अखेर ४५ दिवसांनी, बुधवारी पोलिसांनी मीठाच्या खड्डयातून बाहेर काढला़  तिच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार, पुन्हा शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात नेण्यात येत आहे. तत्पूर्वी, या प्रकरणात बलात्कार आणि खुनाचा गुन्हाही दाखल करण्यात आला.

धडगाव येथे १ ऑगस्ट रोजी मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याची तक्रार वडिलांनी करूनही पोलिसांनी आत्महत्येचा गुन्हा नोंदवला होता. त्यामुळे न्यायाच्या मागणीसाठी वडिलांनी मृतदेह मीठाच्या खड्डयात ठेवला होता. याबाबत ‘लोकसत्ता’ने १३ सप्टेंबरला वृत्त दिल्यानंतर वेगाने हालचाली सुरू झाल्या.

पुन्हा शवविच्छेदन करण्याच्या कुटुंबीयांच्या मागणीनुसार, मंगळवारी पोलीस आणि आरोग्य अधिकाऱ्यांचे पथक खडक्या गावात दाखल झाले होते. परंतु, मुंबईत किंवा मुंबईतील डॉक्टरांकडूनच शवविच्छेन करावे, असा आग्रह कुटुंबीयांनी कायम ठेवला़  त्यानुसार हे पथक बुधवारी पुन्हा गावात दाखल झाले.  पोलीस अधीक्षक पी. आर. पाटील यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांच्या मदतीने मृतदेह मुंबईतील जे. जे. रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविण्याबाबत सर्व प्रक्रिया पूर्ण केली. मिठाच्या खड्डय़ात पुरलेला मृतदेह बाहेर काढून तो रात्री उशिरा विच्छेदनासाठी मुंबईकडे पाठविण्यात आला.

न्यायासाठी..

पीडित कुटुंबाने पोलीस अधीक्षकांसह मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधान परिषदेच्या उपसभापतींना बुधवारी पत्र पाठवून न्यायासाठी याचना केली. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पीडित कुटुंबाशी संवादही साधला. शिवसेनेचे नंदुरबार जिल्ह्यातील आमदार आमश्या पाडवी यांनीही खडक्या येथे जाऊन पीडित कुटुंबाची विचारपूस केली.

Story img Loader