वाई : सातारा जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्यांमध्ये शिक्षा लागण्यासाठी विशेष कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तीन लाख दहा हजार रुपयांची बक्षीसे आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव केला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल उपस्थित होत्या.
सातारा जिल्हयातील पोलीस ठाण्यांकडून वेगवेगळया न्यायालयांमध्ये खून, खुनाचा प्रयत्न, बालकांवरील अत्याचार, ठकबाजी, महिलांवरील अत्याचार, हलगर्जीपणामुळे मृत्यु, गंभीर दुखापत या सारख्या गुन्हयाचे निकालामध्ये आरोपींना शिक्षा झालेल्या आहेत. त्यामध्ये योगदान असलेले तपासी पोलीस अधिकारी, गुन्हयाचे तपासामध्ये मदत करणारे पोलीस अंमलदार, दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर, आरोपीला शिक्षा लागेपर्यंत, न्यायालयात पाठपुरावा करणारे सातारा जिल्हयातील विविध पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व पैरवी अधिकारी यांना या पुढेही अशाच प्रकारे चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहनपर बक्षीस म्हणून रोख रक्कम तीन लाख दहा हजार रुपये व प्रशस्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या दालनात पार पडला. यावेळी अपर पोलीस अधीक्षक आंचल दलाल याही उपस्थित होत्या.
आणखी वाचा-नांदेडच्या शासकीय रुग्णालयात मृत्यूसत्र सुरूच, गेल्या ८ दिवसांत १०८ जणांचा मृत्यू
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक. समीर शेख म्हणाले, सातारा पोलीस दलामध्ये गुन्हा सिध्दीचे प्रमाण वाढण्याचे दृष्टीने पोलीस दलामार्फत विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्या दृष्टीने प्रोत्साहन मिळावे यासाठी बक्षीस म्हणून रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्याचा उपक्रम राबवला. या उपक्रमांमुळे गुन्हयाचा दर्जात्मक व उत्कृष्टरित्या तपास करुन गुन्हे सिध्द होण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
नोव्हेंबर २०२२ ते जुलै २०२३ या कालावधीत अनेक गुन्हयांमध्ये दोषसिध्दी मिळालेल्या फलटण शहर, उंब्रज, सातारा शहर, शाहुपूरी, कराड शहर, कराड तालुका, मेढा, भुईंज, वडुज, ढेबेवाडी या पोलीस ठाणेतील तपासी अधिकारी, पैरवी अधिकारी, पोलीस अंमलदार यांना रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देवुन गौरवण्यात आले.