शुक्रवारी कोल्हापूरच्या राजर्षी शाहू महाराजांचे स्मृती शताब्दी वर्ष साजरे होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी निमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ज्या वृत्तीविरोधात शाहू महाराज लढले ती अजूनही संपलेली नाही असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
“काही राजांचा स्मृतीदिन आठवावा लागेल एवढे ते दीन होते. फक्त गादीवर बसले म्हणून राजे झाले. पण जर नीट विचार केला तर मला नाही वाटत की हे राजे कधी आरामात गादीवर बसले असतील. सातत्याने दीनदुबळ्यांसाठी संघर्ष करणारे हे राजे होते. शाहू महारांज्या आयुष्यात अनेक संघर्ष झाले,” असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“काही जण कुचाळक्या करत असतात. तुम्ही स्मारक बांधणार पण पैसे कुठे आहेत असे म्हणतात. या वृत्तीच्याच विरोधात शाहू महाराज लढले आहेत. त्यांनी जो संघर्ष केला तो याच वृत्तीच्या विरोधात. त्यावेळी मुंबई सरकारने त्यांना इशारा दिला होता की तुम्ही जे करताय ते तुमच्या संस्थानात करा इतर ठिकाणी नाही. यावर शाहू महाराजांनी दिलेलं उत्तर फार महत्त्वाचे आहे. आज आपल्या देशात काय चालले आहे त्यापेक्षा पारतंत्र्यात काय चालले होते हे बघणे आवश्यक आहे. ज्या वृत्तीविरोधात महाराज लढले ती वृत्ती आज खरोखर संपली आहे का याचा विचार करण्याची गरज आहे,” असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
“मी माझ्या आजोबांकडून जे ऐकले आणि जे मी वाचतोय त्यातून नक्की आहे की छत्रपती शाहू महाराज हे कोणत्याही व्यक्ती विरुद्ध नव्हते तर ते वृत्ती विरुद्ध होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे आयुष्य ५० तर छत्रपती शाहू महाराजांचे आयुष्य ४८ वर्षे होते. पण औरंगजेब ९० वर्षे जगला. छत्रपती शिवाजी महाराजांना ९० वर्षोचे आयुष्य लाभले असते आणि औरंगजेब ५०व्या वर्षी आटोपला असता तर देशाचे आणि राज्याचे चित्र बदलले असते. या गोष्टी इतिहासात मागे जाऊन सुधारु शकत नाही,”असेही मुख्यमंत्री म्हणाले.