सोलापूर : भूखंड खरेदी करण्यासाठी माहेरातून पैसा आणत नाही म्हणून शारीरिक व मानसिक छळ करून नवविवाहितेला तिहेरी तलाक दिला आणि तिला माहेरी हाकलून दिल्याप्रकरणी पतीसह सासरच्या मंडळींविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
तनजिला अहमदअली पठाण (वय २२, रा. मुस्लीम पाच्छा पेठ, सोलापूर) असे पीडित विवाहितेचे नाव आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार नई जिंदगी चौक परिसरात राहणाऱ्या तिच्या पतीसह सासरा, सासू आणि चार नणंदांविरुद्ध हुंड्यापायी जाचहाट करण्यास प्रतिबंध कायद्यासह मुस्लिम महिला कायदा कलम ४ नुसार जेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपाट कारखानदाराची मुलगी असलेल्या तनजिला हिचा विवाह जून २०२२ मध्ये झाला होता. लग्नात स्त्रीधन म्हणून तिला वडिलांनी अकरा तोळे सोन्याचे दागिने व इतर किंमती सामान दिले होते. लग्नानंतर चार महिन्यांनी सासरच्या मंडळींनी तिचा जाचहाट सुरू केला. लग्नात योग्य मानपान केला नाही. तू आमच्या योग्यतेची नाही, असे टोचून बोलणे सुरू झाले. माहेराहून भूखंड खरेदी करण्यासाठी पैसा आणावा म्हणून तगादा लावला असता त्यांची पूर्तता न झाल्याने तनजिला हिचा आणखी छळ होऊ लागला.
हा छळ सहन करीत तिने मुलीला जन्म दिला. परंतु तेव्हा पतीसह सासरे व इतरांनी, आम्हाला मुलगा हवा होता, तू मुलीला जन्म दिलास असे जाणीवपूर्वक टोचून बोलून त्रास दिला. नेहमी उपासमार करणे, शिळे अन्न खायला देणे, आजारी पडल्यावर वैद्यकीय उपचार मिळवून न देणे असे प्रकार सासरी होत असताना अखेरीस पतीने तनजिला हिला तीनवेळा तलाक-तलाक-तलाक म्हणून तिला घरातून हाकलून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे.