राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते अनंत गाडगीळ यांना भूमिकाच मांडता आली नाही. सिंचनासाठी अन्य विभागांतून वळविलेली रक्कम, मावळचा गोळीबार आणि राज्यातील पाणीवाटपाचा प्रश्न यावर त्यांची भंबेरी उडाली.
काँग्रेसच्या निवडणूक जाहीरनाम्याची बैठक २४ सप्टेंबरला होणार असून, त्या दिवशी तो अंतिम केला जाईल, असे गाडगीळ यांनी सांगितले. जाहीरनामा तयार करण्यासाठी तीन वेगवेगळ्या उपसमित्या नेमण्यात आल्याची माहिती त्यांनी पत्रकार बैठकीत दिली. केंद्र सरकारच्या दुहेरी भूमिकांवर त्यांनी जोरदार हल्ला केला. लोकसभेच्या निवडणूक प्रचारात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारने देशाची वाट लावली, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी करीत होते. निवडणुकीनंतर भूतानच्या दौऱ्यावर ते गेले होते. तेव्हा ‘गेल्या १० वर्षांत भारताने नेत्रदीपक प्रगती केली’ असे वक्तव्य त्यांनी केले. त्यांची ही दोन्ही वक्तव्ये विरोधाभासी आहेत. शपथविधीच्या वेळी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांना निमंत्रित करण्यात आले. यावर शिवसेनेची भूमिका काय? बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हे स्वीकारले असते काय? बाळासाहेबांना भाजप विसरतोय, असे चित्र निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले.
राज्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांवर मात्र गाडगीळ यांना भूमिकाच स्पष्ट करता आली नाही. विशेषत: पाणीवाटपाचा प्रश्न, मावळचा गोळीबार, अल्पसंख्य व दलित विभागासाठी दिलेला निधी सिंचन विभागाकडे वळविण्याचे प्रकार घडल्याचे लक्षात आणून दिल्यानंतर ‘माहिती घेतो आणि मगच सांगता येईल’ एवढेच उत्तर त्यांनी दिले. विधानसभा निवडणुकीत राज्य सरकारने केलेले चांगले काम आणि विरोधी पक्षातील अंतर्गत सुंदोपसुंदीवर प्रचारात भर दिला जाईल, असेही त्यांनी सांगितले. आघाडी सरकारच्या कालखंडात राजीव गांधी जीवनदायी योजनेमुळे राज्यात २ लाख ४० हजार जणांना लाभ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेसचे शहराध्यक्ष सय्यद अक्रम यांची उपस्थिती होती.