Trupti Desai on Walmik Karad & Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग या गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी वाल्मिक कराडवर वेगवेगळे आरोप होत आहेत. देशमुख कुटुंब, मस्साजोगचे ग्रामस्थ व विरोधी पक्षांमधील आमदारांसह अनेक नेत्यांनी या हत्याप्रकरणी वाल्मिक कराडकडे बोट दाखवलं आहे. ९ डिसेंबर २०२४ रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं होतं. दुसऱ्या दिवशी त्यांचा मृतदेह सापडला. त्यानंर २० दिवस पोलीस वाल्मिक कराडचा शोध घेत होते. परंतु, तो पोलिसांच्या हाती लागला नाही. अखेर ३१ डिसेंबर रोजी त्याने पुण्यात पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. हे २० दिवस तो कुठे लपून बसलेला? त्याला कोण मदत करत होतं? हे प्रश्न अनुत्तरित आहेत. अशातच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मोठा दावा केला आहे. देसाई म्हणाल्या, “वाल्मिक कराड व संतोष देशमुख हत्या प्रकरणातील दुसरा प्रमुख आरोपी विष्णू चाटे हे दोघेही १५ व १६ डिसेंबर रोजी दिंडोरी आश्रमात मुक्कामाला होते. या आश्रमाचे प्रवक्ते आबासाहेब मोरे कराड १६ डिसेंबर रोजी दर्शनाला आला होता असं सांगत आहेत. बाकी आम्हाला काही माहित नाही असंही ते सांगत आहेत. कारण आता त्यांचे बिंग फुटले आहे. त्यामुळे कराड आमच्याकडे आलाच नव्हता हे आश्रमातील लोक सांगू शकत नाहीत. मी सांगितलेली १६ डिसेंबर ही तारीख बरोबर होती”.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तृप्ती देसाई म्हणाल्या, “राज्यभर वाल्मिक कराडविरोधात आंदोलनं चालू असताना हजारो लोकांच्या गर्दीत, तेही नाशिक जिल्ह्यात तो दर्शनाला कसा येऊ शकतो? दर्शनालाच आला असता तर भक्तांनी त्याला ओळखून पोलिसांच्या ताब्यात दिलं असतं. परंतु, त्याला आश्रमात वास्तव्यास ठेवण्यात आले होते, त्याला लपवण्यात आले होते आणि त्याच्याबरोबर विष्णू चाटेही होता. संशयास्पद सीसीटीव्ही फूटेज आढळल्यानेच सीआयडीने आश्रमाचा डीव्हीआर ताब्यात घेतला. १३ डिसेंबर ते १६ डिसेंबरपर्यंत अण्णासाहेब मोरे, त्यांची मुले, वाल्मिक कराडची पत्नी व कुटुंबियांचे सीडीआर काढणे गरजेचे आहे. सत्य परिस्थिती लोकांना समजावी, आश्रमात वाल्मिक कराड हा १५ व १६ डिसेंबर रोजी मुक्कामाला होता हे सीआयडीचा तपास झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी जाहीर करावं. तसेच सीसीटीव्ही फूटेजमधील व्हिडीओ सीआयडीने सार्वजनिक करावेत, जेणेकरून लोकांना सत्य परिस्थिती समजेल. सीआयडीने यामध्ये सर्वांची कसून चौकशी करावी, तसेच हे प्रकरण दाबले जाणार नाही यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना आदेश देणे गरजेचे आहे.

तृप्ती देसाई यांच्या आरोपांवर आश्रम व्यवस्थापनाचं म्हणणं काय?

दरम्यान, स्वामी समर्थ केंद्राचे प्रतिनिधी आबासाहेब मोरे यांनी एबीपी माझाला सांगितलं की “सीआयडीचे अधिकारी आमच्या केंद्रात तपास करण्यासाठी आले होते. त्यांनी आमच्या आश्रमातील सीसीटीव्ही फूटेज तपासलं. त्यात वाल्मिक कराड १६ डिसेंबर रोजी आश्रमात दर्शनासाठी आल्याचं आणि नंतर निघून गेल्याचं दिसून आलं आहे. त्यावेळी आमच्या आश्रमात दत्तजयंतीचा सप्ताह होता. त्यानिमित्त असंख्य भाविक आश्रमात आले होते. त्यामध्ये कोण कोण होतं ते आम्हाला माहिती नाही. तसेच आश्रमात विष्णू चाटे वाल्मिक कराड यांच्याबरोबर नव्हता. ते एकटेच आले होते.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti desai claims walmik karad hide dindori swami samarth kendra on 15 to 16 december ashram clarification rno news asc