नाशिकमधील कपालेश्वर मंदिरात पोलीस बंदोबस्तात प्रवेश करण्यासाठी गेलेल्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आणि इतर महिला आंदोलकांना गुरुवारी धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे पोलीस बंदोबस्त असतानाही तृप्ती देसाई यांना मंदिराच्या गर्भगृहात जाण्यास पुजाऱ्यांनी तीव्र विरोध केला. त्यामुळे इतर भाविकांप्रमाणेच त्यांना गर्भगृहाबाहेरूनच दर्शन घेऊन परतावे लागले. पोलिसांनी त्यांना सुरक्षाव्यवस्थेत नाशिक शहरातून बाहेर नेले. गर्भगृहात पूजाऱ्यांशिवाय इतर कोणालाही प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे आम्ही तृप्ती देसाई यांना आत येऊ देणार नाही, अशी भूमिका पूजाऱ्यांनी घेतली.
यापूर्वी १९ मे रोजी तृप्ती देसाई आणि भूमाता ब्रिगेडने मंदिर प्रवेशासाठी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला होता. या गदारोळात तृप्ती देसाई यांना बाहेर काढून बंदोबस्तात पुण्याच्या दिशेने मार्गस्थ करण्यात आले होते. आपण ब्राम्हण वा गुरव समाजाचे नसल्याचा जातीभेद करत मंदिर प्रवेशास विरोध करण्यात आल्याचे तृप्ती देसाई यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कालच मंदिर प्रशासन समितीला नोटीस बजावली होती आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार महिला आणि पुरुष असा भेदभाव न करता सर्वांना मंदिरात प्रवेश देण्याची सूचना केली होती. तरीही गुरुवारी सकाळी मंदिराच्या आवारात मोठा जमाव जमला होता. पोलीस बंदोबस्तात तृप्ती देसाई यांना मंदिराच्या आत नेले जात असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. आपल्यावर मंदिराबाहेर चप्पलही फेकण्यात आली, असा आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा