उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनिशिंगणापूर येथे शनी मंदिरातील चौथऱ्यावर महिलांच्या प्रवेशाचा मार्ग कायदेशीर मार्ग मोकळा झाला असला तरी आता प्रत्यक्ष प्रवेशावरून भूमाता ब्रिगेड आणि मंदिर प्रशासनातील वाद शिगेला पोहचण्याची शक्यता आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी आजच मंदिरात प्रवेश करण्याचा आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यासाठी त्या पुण्याहून रवाना झाल्या असून त्यांच्याबरोबर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या चित्रा वाघ यादेखील आहेत. त्यामुळे आज शनिशिंगणापूरमध्ये रणकंदन घडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंदिर प्रशासनाने उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्हाला अजूनही उच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाली नसून महिलांना शनी चौथऱ्यावर जाऊ देणार नाही, असा पवित्राही मंदिर प्रशासनाने घेतला आहे.
नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे रक्षण करणे ही सरकारचीच जबाबदारी असल्याचे स्पष्ट करीत धार्मिक स्थळी कोणताही भेदभाव करता येणार नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला सांगितले होते. उच्च न्यायालयाकडून चपराक मिळाल्यानंतर जाग आलेल्या सरकारने मंदिर प्रवेशाबाबत लिंगभेद केला जाणार नाही तसेच या कायद्याची कठोर अंमलबजावणी करत महिलांना राज्य घटनेने दिलेल्या समान अधिकारांचे रक्षण केले जाईल, अशी हमी शुक्रवारी उच्च न्यायालयात दिली होती.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा