धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी अलीकडेच साईबाबांविषयी आक्षेपार्ह विधान केलं आहे. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी साईबाबांना देव मानण्यास नकार दिला आहे. साईबाबा हे संत होऊ शकतात, ते फकीर होऊ शकतात पण ते देव होऊ शकत नाहीत, असं विधान धीरेंद्र शास्त्री यांनी केलं. “गिधाडाचं चामडं पांघरून कुणी सिंह होत नाही”, असंही धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या साईबाबांवरील वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण तापलं आहे. अनेक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देऊन धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाचा निषेध केला आहे. दरम्यान, भूमाता ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई यांनीही धीरेंद्र शास्त्रींवर टीकास्र सोडलं असून त्यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी देसाई यांनी केली. त्यांनी एक व्हिडीओ जारी करत ही टीका केली.
संबंधित व्हिडीओत तृप्ती देसाई म्हणाल्या, “धीरेंद्र शास्त्रीजी, साईबाबा हे कोट्यवधी भक्तांसाठी देवच आहेत. तुमचा सनातन धर्म कोणता आहे? आणि तो साईबाबांना देव का मानत नाही? हे मला माहीत नाही. परंतु जे लाखो भक्त साईबाबांना देव मानतात, त्यांची श्रद्धा दुखावली आहे. तुम्ही त्यांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल झाला पाहिजे.”
“ते साईबाबांना देव मानत नसतील तर धीरेंद्र शास्त्रींना महाराज म्हणायची काहीच गरज नाही. ते आधीच जोकरसारख्या टाळ्या वाजवत असतात. मध्येच हसत असतात. पण आम्ही तुम्हाला जोकर म्हणणार नाही. कारण आमचा धर्म आम्हाला असं काही शिकवत नाही. आम्ही माणुसकी हाच धर्म मानतो. तो धर्म आम्हाला कुणाच्यात भेदभाव करायला शिकवत नाही. त्यामुळे तुम्ही तातडीने साईभक्तांची माफी मागितली पाहिजे. धीरेंद्र शास्त्रींवर गुन्हा दाखल करणं गरजेचं आहे” असंही तृप्ती देसाई म्हणाल्या.