लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. पण ही योजना चर्चेत आल्याचं कारण म्हणजे या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे. त्यावरून अनेकांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मात्र भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी मात्र या निर्णयाला पाठिंबा दर्शवला आहे.
कुटुंब नियोजन कीटमध्ये रबरी लिंग देण्यात आल्याबद्दल बोलताना तृप्ती देसाई म्हणाल्या, “लोकसंख्या ही राज्य सरकारसमोरची एक मोठी समस्या आहे. म्हणूनच राज्य सरकारने सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जे कीट आशा वर्कर्सना समुपदेशनासाठी दिलेलं आहे, त्यामध्ये रबरी लिंग दिलेलं आहे. ते प्रात्यक्षिकासाठी देण्यात आलं आहे. पण त्याला प्रचंड विरोध होतोय. पण या रबरी लिंगाचं प्रात्यक्षिक दाखवणं, अंमलबजावणी करणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात खरोखरच कुटुंब नियोजनासाठी प्रबोधन करायचं असेल तर आशा वर्कर्सनीही अशी संकुचित मानसिकता न ठेवता हे रबरी लिंग आणि ज्या सगळ्या वस्तू आहे, ते घेऊन पुढाकार घेतला पाहिजे. आता हे लिंग घेऊन महिलांसमोर कसं जाऊ, त्यांना ते कसं दाखवू हा विचार बाजूला ठेवला पाहिजे. राज्य सरकारने आपल्या कीटमध्ये रबरी लिंग देऊन कोणतीही चूक केलेली नाही”.
लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. यात राज्य शासनाच्या महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभागाची प्रमुख भूमिका आहे. या विभागाकडून कुटुंब नियोजन उपक्रमही राबविण्यात येत आहेत. यापैकीच एक उपक्रम म्हणजे कुटुंब नियोजन कीटचं वाटप. या कीटमध्ये एक रबरी लिंग देण्यात आलं आहे.
सरकारच्या या निर्णयावर आशा वर्कर नाराज असून त्यांच्यासमोर एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. कारण आरोग्य विभागाकडून आशा वर्कर्सना या कीटचं प्रात्यक्षिक दाखवण्यास सांगितलं आहे. मात्र आता या रबरी लिंगामुळे त्यांच्यासमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. याबद्दल राज्य सरकारकडून अद्याप कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.