त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांना मंगळवारी पुन्हा एकदा ताब्यात घेण्यात आले. पोलीस सातत्याने आपल्यावरच कारवाई करत असल्याबद्दल तृप्ती देसाई यांनी नाराजी व्यक्त केली आणि आंदोलन तात्पुरते स्थगित करीत असल्याचे जाहीर केले. आतापर्यंत आपण आपल्या आंदोलनाची सर्व माहिती देऊनच पुढे जात होतो. पण यापुढे कोणतीही पूर्वकल्पना न देता आंदोलन करण्यात येईल, असे तृप्ती देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.
महाशिवरात्रीदिनी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश करण्याचा इशारा देणाऱ्या भूमाता ब्रिगेडविरोधात हिंदुत्ववादी संघटना एकवटल्या असताना सोमवारी सायंकाळी नाशिक-पुणे महामार्गावर पोलिसांनी ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांच्यासह अन्य महिला कार्यकर्त्यांना रोखत दोन्ही गट समोरासमोर येणार नाहीत याची दक्षता घेतली. या निषेधार्थ ब्रिगेडच्या महिलांनी महामार्गावर काही वेळ ठिय्या दिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती. तत्पूर्वी त्र्यंबकेश्वर येथे महिलांच्या गर्भगृहातील प्रवेशाबाबत सकारात्मक भूमिका घेणाऱ्या साध्वीला हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक महिलांच्या संतापाला तोंड द्यावे लागले. या प्रश्नावर घटनेच्या चौकटीत उभयतांशी चर्चा करून तोडगा काढण्याचे आश्वासन राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे.
शनिशिंगणापूर येथील शनिदेवाच्या चौथऱ्यावर जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या तृप्ती देसाई यांनी महाशिवरात्रीच्या दिवशी त्र्यंबकेश्वर मंदिराच्या गर्भगृहात जाण्याचा इशारा दिला होता. त्यांना रोखण्यासाठी हिंदुत्ववादी संघटना आणि स्थानिक महिलांनी त्र्यंबकमध्ये जागता पहारा दिला.
…यापुढे पूर्वकल्पना न देता भूमाता ब्रिगेडचे आंदोलन – तृप्ती देसाई
आतापर्यंत आपण आपल्या आंदोलनाची सर्व माहिती देऊनच पुढे जात होतो
Written by लोकसत्ता टीम
Updated:
First published on: 08-03-2016 at 17:54 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti desais comment on her agitation