लाचखोरी प्रकरणात गुंतलेल्या महापौर तृप्ती माळवी यांना पदावर पाणी सोडण्याची वेळ आली आहे. आगामी सर्वसाधारण सभेमध्ये त्या राजीनामा सादर करणार आहेत. तथापि माळवी यांच्या लाचखोरीचे पडसाद राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये उमटले आहेत. त्यांचे पक्षाचे सदस्यत्व व नगरसेवकपद रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस लागू केली जाणार असल्याचे शहराध्यक्ष आर.के.पोवार यांनी रविवारी सांगितले. तर, पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या (सोमवारी) करवीरनगरीत येणार असून त्यावेळीही माळवी यांच्या लाच स्वीकारण्याच्या प्रकरणाची पक्षपातळीवर चर्चा होणार असल्याचे सांगण्यात येते.
जमिनीचे आरक्षण उठवण्याप्रकरणी १६ हजारांची लाच स्वीकारल्याबद्दल महापौर माळवी व त्यांचा खासगी स्वीय सहायक, मामेभाऊ अश्विन मधुकर गडकरी यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. गडकरी यांना अटक केली आहे, तर अटक टाळण्यासाठी माळवी या खासगी रुग्णालयात दाखल झाल्या आहेत. माळवी या लाचखोरीच्या प्रकरणात चांगल्या अडकल्या असून पक्षानेही त्याची गांभीर्याने नोंद घेतली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पक्षाला आणखी लांच्छन लागू नये, यासाठी पक्षपातळीवर हालचाली गतिमान झाल्या आहेत. त्यातूनच माळवी यांना महापौर पदाचा राजीमाना देण्यास पक्षाने भाग पाडले आहे. ९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापालिकेच्या सभेत त्या पदाचा राजीनामा सादर करणार आहेत, तत्पूर्वी त्यांनी पक्षाचे शहराध्यक्ष आर.के. पोवार यांच्याकडे राजीनामापत्र सुपूर्त केले आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बदनामी टाळण्याच्या दृष्टीने पुढचे पाऊल टाकण्यास सुरुवात केली आहे. लाचखोर प्रकरणात गुंतलेल्या माळवी यांनी पक्षाचे सदस्यत्व तसेच नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा यासाठी पक्षाकडून दबाव टाकला आहे. तसेच या आशयाची नोटीसही पोवार हे माळवी यांना देणार आहेत. त्यांना महापौर पदापाठोपाठ पक्षाचे सामान्य सदस्यत्वही गमवावे लागणार असल्याचे आता दिसत आहे. तर उद्या (सोमवारी) येथील शाहू स्मारकात राष्ट्रवादी कॉंग्रेसचा मेळावा होत असून, त्यामध्ये या लाचखोरीचे पडसाद उमटण्याची शक्यता लक्षात घेऊन पक्ष नेतृत्वाने सावध पवित्रा घेतला आहे. अजित पवार हे माळवी यांच्याबद्दल कोणती भूमिका घेणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा