परभणी :  शहर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तृप्ती सांडभोर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या पनवेल महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त पदावर कार्यरत होत्या. येथून बदलून जाणार असलेले आयुक्त देविदास पवार यांच्या बदलीचे ठिकाण मात्र अजून स्पष्ट झाले नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाने महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने दिनांक ३० ऑगस्ट रोजी नियुक्तीचे आदेश काढले आहेत. अवर सचिव अ. का. लक्कसे यांच्या स्वाक्षरीने हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. पनवेल महानगरपालिकेत कार्यरत अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची प्रशासकीय कारणास्तव नांदेड वाघाळा महापालिका येथे त्याच पदावर पदस्थापना करण्यात आली होती. दरम्यान, या पदस्थापनेत अंशत: बदल करण्यात येऊन श्रीमती सांडभोर यांची परभणी महानगरपालिका आयुक्त पदावर पदस्थापना करण्यात आली आहे. त्यांनी आयुक्त पदाचा कार्यभार स्वीकारावा व तसा अनुपालन अहवाल शासनास सादर करावा असे नियुक्ती आदेशात म्हटले आहे.

दरम्यान, नांदेड वाघाळा महानगरपालिकेचे आयुक्त सुनील लहाने यांची परभणी मनपा आयुक्त पदावर करण्यात आलेली नियुक्ती रद्द झाली आहे.

लहाने हे नांदेड वाघाळा मनपा आयुक्त या पदावर पुढील आदेशापर्यंत कार्यरत राहतील, त्या आदेशात म्हटले आहे. नांदेड -वाघाळा महानगरपालिका आयुक्त डॉ . सुनील लहाने यांची बदली काही तासांचीच ठरली. रात्रीतून निघालेले आदेश हे रात्रीतूनच रद्द झाले. नांदेड येथे आयुक्त म्हणून ज्यांचे आदेश निघाले होते, त्या तृप्ती सांडभोर या परभणी मनपा आयुक्त म्हणून जाणार असल्याचे नव्या आदेशाने स्पष्ट झाले.

येथून बदलून गेलेले मनपा आयुक्त देविदास पवार हे आपल्या कामगिरीचा ठसा उमटवू शकले नाहीत. प्रशासनावर पकड असणाऱ्या आणि शहर विकासाची दृष्टी असणाऱ्या आयुक्तांची सध्या आवश्यकता आहे. महापालिका कर्मचाऱ्यांचे वेतन रखडले असून किमान नागरी सुविधा सध्या शहरात दुरापास्त आहेत. शहरातील रस्त्यांची खराब अवस्था ही सध्या नागरिकांची डोकेदुखी आहे. महापालिकेने गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांची रस्त्याची कामे केली असली, तरी चांगल्या रस्त्यांची पुन्हा नाहक दुरुस्ती दाखवत प्रचंड खर्च केला आहे. याउलट वर्षांनुवर्षे असणाऱ्या खराब रस्त्यांकडे मात्र अद्यापही मनपा प्रशासनाचे दुर्लक्ष आहे या सर्व पार्श्वभूमीवर येणाऱ्या मनपा आयुक्तांसमोर अनेक आव्हाने आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trupti sandbhor news commissioner of parbhani municipal corporation zws