शेतकरी व मच्छीमार हे बँकेचे दोन घटक असून हा घटक कोणत्याही योजनेपासून वंचित राहू नये यासाठी तळागळातील शेतकऱ्यासह कोळी बांधवाला आरडीसीसीमार्फत अनेक योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन आरडीसीसी बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांनी केले.
आरडीसीसी बँकेची ५२ वी वार्षकि सर्वसाधारण सभा बँकेचे चेअरमन आ. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथील मुख्य कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या वेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
या वेळी बँकेचे व्हाईस चेअरमन सुरेश खैरे, संचालक नृपाल पाटील, प्रशांत नाईक, निकिता पाटील, एॅड. परेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे, आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी, संचालक मंडळ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
वार्षकि सर्वसाधारण सभेमध्ये मार्गदर्शन करताना आ. जयंत पाटील यांनी सांगितले की, रुपे डेबिट कार्ड व केसीसी डेबिट कार्ड कार्यान्वित करण्याचा देशातील पहिला मान आरडीसीसी बँकेने मिळवला असून एक मॉडेल व आदर्श बँक म्हणून तिचा उल्लेख केला जात आहे. याचा मला अभिमान वाटतो. आरडीसीसी बँकेतील संचालक मंडळ,अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळेच हे शक्य झाले आहे. त्यामुळे याचे श्रेय संचालक मंडळासह बँकेतील अधिकारी व कर्मचारी यांना जात आहे.
आरडीसीसी बँकेमार्फत विविध उपक्रम राबवून विविध कार्यकारी संस्थेला स्वबळावर नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून सुकी मच्छी सुरक्षित ठेवण्यासाठी मच्छीमारांसाठी कोल्ड स्टोअरेजची निर्मिती करणे गरजेचे आहे, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले.
या सभेमध्ये सुरुवातीस मागील दिनांक १ ऑगस्ट २०१२ रोजी झालेल्या वार्षकि सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त व दिनांक २५ मार्च २०१३ रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत इतिवृत्त वाचन करणे, संचालक मंडळाने तयार केलेला २०१२-२०१३ सालचा वार्षकि अहवाल, ताळेबंद व नफा-तोटा पत्रक विचार करून मंजुरी देणे, संचालक मंडळाने सुचविलेल्या २०१२-२०१३ सालच्या नफा वाटणीस मंजुरी देणे, सन २०१२-२०१३ सालचे अंदाजपत्रकानुसार प्रत्यक्षात झालेल्या खर्चास व उत्पन्नास तसेच २०१३-२०१४ सालकरिता संचालक मंडळाने सुचविलेल्या अंदाजपत्रकास मान्यता देणे, २०१२-२०१३ या वर्षांत झालेल्या हिशेब तपासनीस यांच्या लेखापरीक्षण अहवालातील अभिप्राय वाचून त्याची नोंद घेणे, सन २०१३-२०१४ या वर्षांचे लेखापरीक्षण करण्यासाठी सहकार खात्याच्या मंजूर पॅनलवरील लेखापरीक्षकाची नियुक्ती करणे, बँकेच्या सभासदांना गतवर्षी दिलेल्या भेटवस्तूच्या खर्चास मान्यता देणे व सन २०१३-२०१४ सालाकरिता भेटवस्तू खरेदीस परवानगी देणे, सामोपचार कर्ज परतफेड योजनेस सन २०१३-२०१४पर्यंत मुदतवाढ देणे अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली असून त्यास सर्वानी मंजुरी दिली. तसेच अध्यक्षांच्या परवनागीने आयत्या वेळी येणाऱ्या विषयांवरदेखील चर्चा करून मंजुरी देण्यात आली.
त्याशिवाय आरडीसीसी बँकेच्या मुख्य कार्यालयातील कर्मचारी व विविध शाखांतील शाखाधिकारी यांनी उत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. यामध्ये अरिवद पाटील, सतिश देशमुख, अविनाश कुलकर्णी, अजित भगत, ए. पी. जाधव, लहू पाटील, पी. डी. म्हात्रे, संदीप जगे, एस. जी. नागे, एम. एम. वर्तक, एस. एन. जगताप, एल. टी. बनसोड, जी. एस. हावरे, पी. पी. सुर्वे, एम. एल. लोकरे, एस. जी. पाटील, ए. वाय. मयेकर आदींना गौरविण्यात आले.

Story img Loader