कोकणच्या विकासात गाडगीळ अहवालाने होणारे अडथळे दूर करण्याचा आमचा प्रयत्न  सुरू असून, कोकणातील मच्छीमारांना डिझेल दरवाढीचा बसणारा फटका केंद्रीय अर्थमंत्री व पेट्रोलियममंत्र्यांच्या कानावर दिल्लीत जाऊन घालणार आहे. त्यात सर्वसामान्य मच्छीमारांना फायदा होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त करून कोकणासह राज्यात काँग्रेस बळकटीचा संदेश देऊन परिवर्तन घडवू या, असे आवाहन कणकवली येथे केले.
कणकवलीचे माजी नगराध्यक्ष, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस संदेश पारकर यांच्यासह त्यांच्या शेकडो सहकाऱ्यांना काँग्रेस प्रवेश देण्यात आला, त्यावेळी मुख्यमंत्री चव्हाण बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, उद्योगमंत्री नारायण राणे, संदेश पारकर, जिल्हाध्यक्ष सतीश सावंत, आ. सुभाष चव्हाण, माजी मंत्री प्रवीण भोसले, माजी आमदार राजन तेली, जिल्हा परिषद अध्यक्ष निकिता परब व मान्यवर उपस्थित होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात यापुढे एकदिलाने विकासाचे राजकारण व्हायला हवे, असे मुख्यमंत्री  चव्हाण म्हणाले. कोकण, सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे अनेक प्रश्न आहेत ते मार्गी लावण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. कोकणचे पर्यावरण राखणाऱ्या जनतेला गाडगीळ समितीच्या अहवालाने अंध:कारमय जीवन जगावे लागणार असल्याचे पंतप्रधानांच्या लक्षात आणून दिले असून, त्यातून प्रश्न मार्गी लागतील. म्हणूनच यापुढे पर्यावरणाचे रक्षण करत विकास साधण्याचे आवाहन त्यांनी केले.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांत न्यायालयाचा बंदी आदेश लागू असल्याने विकासकामे रोखली आहेत. त्यावरही मार्ग काढला जाईल, असे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगून कोकणचा विकास, सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा, विमानतळ, सीवर्ल्ड प्रकल्प, लघु औद्योगिक व पर्यटन उद्योग धोरणानुसार विकास साधण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी सिंधुदुर्गातच नव्हे तर कोकणात काँग्रेसमय वातावरण निर्माण करण्यासाठी सर्वानी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. शिवसेना-भाजप विरोधी पक्ष असूनही त्यांची अवस्था विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात कमी पडत आहे  असे ते म्हणाले. राष्ट्रवादीला लक्ष्य करताना त्यांनी मित्रपक्ष काँग्रेसला डिवचण्याचा या ठिकाणी येऊन प्रयत्न करत असेल, तर जशास तसे उत्तर देऊ या. तसेच राणे यांचे नेतृत्व ठोशास ठोसा देणारे असल्याने काँग्रेस पक्षाला चांगले नेतृत्व लाभले असल्याचे ते म्हणाले.
यावेळी काँग्रेस नेते उद्योगमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग काँग्रेसमय करू या, असे आवाहन करून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात मला असा विरोध राहिलेला नाही. आमच्याकडील काही बुजुर्ग मंडळी राष्ट्रवादीत गेली आहेत. त्यापेक्षा काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी तरुण नेतृत्वाला आम्ही संधी दिल्याचे त्यांनी स्पष्ट करून, संदेश पारकर व सहकाऱ्यांना पक्षात संदेश दिला जाईल असे म्हटले आहे.
काँग्रेसमध्ये प्रवेश करणाऱ्या संदेश पारकर यांनी सिंधुदुर्गात राष्ट्रवादीचे वारूळ आपण वाढविले, आयत्या बिळात नागोबाने प्रवेश केला आहे. त्या राष्ट्रवादीच्या नागोबाला ठेचण्याची शपथ आपण घेत असल्याचे पारकर यांनी ठणकावून सांगितले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा