जळगाव : राष्ट्रीय पातळीवर लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात होताच जळगाव जिल्यातील रावेर, जळगाव लोकसभा मतदार संघात राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या १५ वर्षांपासून या दोन्ही मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी अशी सरळ लढत होत असून दोन पंचवार्षिकपासून दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. यंदा भाजप-शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात सेनेतर्फे संभाव्य उमेदवाराचे नाव जाहीर करून

मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. दुसरीकडे रावेर लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा केला असून ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. या रस्सीखेचमुळे दोन्ही मतदार संघात चुरस निर्माण झाली आहे.

जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले आहेत. मागील तीन पंचवार्षिकचा इतिहास बघितल्यास रावेर लोकसभा मतदार संघावरुन दोन्ही पक्षात सुरु असलेली रस्सीखेच आजही सुरु आहे. या वर्षी ही जागा काँग्रेसकडे घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. गेल्या महिन्यात फैजपूर येथे झालेल्या अधिवेशनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी तसे संकेत दिल्याने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी तयारी सुरु केली आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी रावेर मतदार संघाची जागा काँग्रेसला मिळावी म्हणून प्रयत्न केले. मात्र जागा न सुटल्याने त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. यावेळी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील असलेले माजी आमदार मनीष जैन यांनी जागा काँग्रेसला न सुटल्याने ऐनवेळी राष्ट्रवादीत प्रवेश करून उमेदवारी केली होती. मात्र ही जागा सोडण्यास राष्ट्रवादीचा विरोध असून त्यांनी दोन्ही मतदार संघात तयारी सुरु केल्याने दोन्ही पक्षांत स्पर्धा वाढली आहे. शिवसेनेत गेलेले माजी आमदार संतोष चौधरी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये परतले आहेत.

यामुळे रावेरमध्ये संतोष चौधरींसह जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रवींद्र पाटील यांची नावे संभाव्य उमेदवार म्हणून पुढे आली आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांनी दोन्ही मतदार संघांची चाचपणी करुन कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. भाजपतर्फे खासदार रक्षा खडसे यांचे नाव निश्चित मानले जात आहे. दुसरीकडे जळगाव लोकसभा मतदार संघातून शिवसेनेचे माजी आमदार आर. ओ. पाटील यांचे नाव शिवसेनेने जाहीर करीत संपूर्ण मतदार संघात मेळाव्यांचे आयोजन करून संपर्क सुरु केला आहे. यामुळे भाजप-सेनेतील कटूता वाढली आहे. जळगावमधून भाजपतर्फे कोण उमेदवार राहील, यावर देखील अनेक दिवसांपासून चर्चा झडत आहे. भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी इच्छुक म्हणून जाहीर केले आहे. राष्ट्रवादीचे माजी आमदार साहेबराव पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला असल्याने त्यांना देखील संधी मिळण्याची अटकळ बांधली जात आहे. खासदार ए. टी. पाटील यांनी मतदार संघात गाठीभेटी वाढवल्या आहेत. यामुळे रावेरसह जळगाव मतदार संघात प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.

शिवसेनेचीही मोर्चेबांधणी

गेल्या १५ वर्षांपासून या दोन्ही मतदार संघात भाजप-राष्ट्रवादी अशी सरळ लढत होत असून दोन पंचवार्षिकपासून दोन्ही ठिकाणी भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. यंदा भाजप-शिवसेना स्वबळावर लढण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने जळगाव लोकसभा मतदार संघात सेनेतर्फे संभाव्य उमेदवाराचे नाव जाहीर करून

मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्य़ातील जळगाव आणि रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ जागा वाटपात राष्ट्रवादीच्या वाटय़ाला आले आहेत. मागील तीन पंचवार्षिकचा इतिहास बघितल्यास रावेर लोकसभा मतदार संघावरुन दोन्ही पक्षात सुरु असलेली रस्सीखेच आजही सुरु आहे.