तुळजापूर : शारदीय नवरात्रोत्सवापूर्वी सलग नऊ दिवसांपासून सुरू असलेली कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा गुरूवारी पहाटे समाप्त होणार आहे. त्यानंतर पहाटे देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना करून नित्योपचार पूजा व घटस्थापनेने शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ होणार आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्र महोत्सवाची पूर्वतयारी मंदिर प्रशासन व नगरपालिका प्र्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे. २४ सप्टेंबर रोजी तुळजाभवानी देवीची मंचकी निद्रा सुरू होती. दरम्यान तुळजापूर नगरपालिका, तुळजाभवानी मंदिर संस्था आणि जिल्हा प्रशासनाच्यावतीने भाविकांसाठी पाणी, स्वच्छता व आरोग्याशी संबंधित सोयी-सुविधांची संपूर्ण तयारी करण्यात आली आहे. देवीच्या मंदिर शिखरावर रंगरंगोटी, पावसात भाविकांची गैरसोय होवू नये यासाठी उभारण्यात आलेला मंडप, विद्युत रोषणाई, महाद्वारावर देवीच्या विविध रूपांचे दर्शन घडविणारी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. तसेच मंदिराकडे येणार्‍या सर्व रस्त्यांवरील अतिक्रमण हटविण्यात आले असून व्यापार्‍यांनी रस्त्यालगत प्रासादिक वस्तू, देवीच्या साड्यांची दुकाने थाटून संपूर्ण तयारी केली आहे.

देवीची गुरूवार, ३ ऑक्टोबर रोजी पहाटे मंचकी निद्रा संपल्यानंतर तुळजाभवानी देवीची सिंहासनावर प्रतिष्ठापना केली जाणार आहे. दुपारी १२ वाजता मंदिरात विधीवत घटस्थापना केली जाणार आहे. ७ ते ११ ऑक्टोबर या कालावधीत तुळजाभवानी देवीच्या विशेष अलंकार पूजा मांडण्यात येणार आहेत. त्यानुसार पहिल्या दिवशी रथालंकार, त्यानंतर मुरलीअलंकार, शेषशाही अलंकार, भवानी तलवार अलंकार आणि शेवटी महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा देखाव्यासह मांडली जाणार आहे.

हेही वाचा : यूपीआय, ऑनलाइन ॲप, एटीएम कार्ड नसूनही फसवणूक, खात्यातून ५० हजार लंपास

या कालावधीत मंदिर परिसरात दररोज तुळजाभवानी देवीचा छबीना मिरवणुकीचा धार्मिक विधी पार पडणार आहे. १२ ऑक्टोबर रोजी दुपारी धार्मिक विधी आणि त्यानंतर घटोत्थापनाने नवरात्र महोत्सवाची सांगता होणार आहे. त्याचदिवशी रात्री नगरहून येणार्‍या मानाच्या पलंग पालखीसमवेत मिरवणूक आणि १३ ऑक्टोबरला पहाटे विजयादशमीच्या दिवशी तुळजाभवानी देवीचे सिमोल्लंघन होणार आहे. यंदाच्या सिमोल्लंघनात देवीच्या पालखीवर कुंकवाऐवजी फुलांची उधळण करण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. सिमोल्लंघनानंतर देवीची श्रमनिद्रा सुरू होईल. १६ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमा आणि १७ ऑक्टोबर रोजी पहाटे तुळजाभवानी देवीची पुन्हा एकदा सिंंहासनावर प्रतिष्ठापना केली जाईल. त्याचदिवशी रात्री सोलापूरच्या मानाच्या काठ्यांसह छबीना मिरवणूक, जोगवा व विविध धार्मिक विधी पार पडणार आहे. अशाप्रकारे नवरात्रोत्सवाचा दिनक्रम असणार आहे.