दुर्धर आजाराला आमंत्रण देणारे फ्लोराईडयुक्त पाणी तुळशीची पाने व देठांचा वापर करून शुद्ध करण्याचा प्रयोग येथील राहुल कांबळे या प्राध्यापकाने यशस्वी करून दाखवला आहे. इंडियन सायन्स काँग्रेसने या संशोधनावर मोहोर उमटवली असून यामुळे वैद्यकीय उपचार नसलेल्या फ्लोरोसिस या आजारावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे. या संशोधनानंतर अनेक औषध कंपन्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला, पण त्यांनी या कंपन्यांना साफ नकार देऊन सरकारला मोफत मदत करण्याची तयारी दर्शवली आहे.
देशातील अनेक भागांत फ्लोराईडयुक्त पाणी नागरिकांना प्यावे लागते. काही स्वयंसेवी संस्थांनी केलेल्या पाहणीनुसार देशातील २५ कोटी नागरिकांना या पाण्यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. हे पाणी शुद्ध करण्यासाठी आजवर शासकीय यंत्रणांकडून बरेच प्रयत्न झाले, पण त्याला म्हणावे तसे यश मिळाले नाही. या पाश्र्वभूमीवर येथील सरदार पटेल महाविद्यालयातील पर्यावरण विज्ञान विभागाचे प्रा. राहुल कृष्णा कांबळे यांनी केलेले संशोधन बराच दिलासा देणारे ठरले आहे. फ्लोराईडयुक्त पाणी शुद्ध करण्यासाठी कांबळे यांनी शेकिंग व बॉयलिंग अशा दोन पद्धती विकसित केल्या आहेत. ७५ मिलीग्रॅम तुळशीची पाने व देठे शंभर मिलीलिटर पाण्यात किमान २० मिनिटे टाकून ठेवली, तर त्यातील ९४ टक्के फ्लोराईड नष्ट होते, असा निष्कर्ष कांबळे यांनी ४ वर्षांच्या संशोधनानंतर काढला आहे. प्रचलित निकषानुसार पाण्यात १ ते १.५ टक्के फ्लोराईड असले पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल तर फ्लोरोसिस हा आजार होतो. या संशोधनानुसार तुळशीच्या पानांमुळे निकषाएवढेच फ्लोराईड पाण्यात शिल्लक राहते, असे कांबळे यांनी आज ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
तुळशीचे झाड सर्वत्र उपलब्ध असते. ते उपलब्ध झाले नाही तर तुळशीची पाने व देठ वाळवूनसुद्धा त्यांचा वापर पाणी शुद्ध करण्यासाठी करता येऊ शकतो, असे ते म्हणाले. कांबळे यांच्या या संशोधनावर इंडियन सायन्स काँग्रेसनेसुद्धा शिक्कामोर्तब केले आहे. त्यांचा संशोधनपर लेख गेल्या वर्षी सायन्स काँग्रेसने स्वीकृत केला होता. याशिवाय, इंडियन जर्नल ऑफ एन्व्हायर्नमेंटल प्रोटेक्शननेसुद्धा त्यांचे संशोधन प्रसिद्ध केले आहे.
मूळचे नागपूरचे असलेले कांबळे यांनी पर्यावरण विज्ञान शाखेत एमएस्सी केल्यानंतर नेदरलँडहून याच विषयात उच्चशिक्षण घेतले. प्रारंभीची पाच वर्षे दिल्लीच्या सीएसआयआरमध्ये संशोधक म्हणून काम केल्यानंतर आता ते येथे अध्यापन क्षेत्रात सक्रिय आहेत.
फ्लोराईडयुक्त पाण्याचे सेवन केल्याने नागरिकांची हाडे ठिसूळ होतात. दात खराब होतात. जसजसे वय वाढते तसे शरीर वाकडे होते. या आजाराला फ्लोरोसिस म्हणतात. वैद्यकशास्त्रात यावर नेमके उपचार नाहीत. त्यामुळे नागरिकांनी हा साधा उपाय केला तरी बराच फरक पडू शकतो, असे ते म्हणाले.
फ्लोरोसिसच्या आजारावर तुळशीच्या पानांचा रामबाण उपाय
दुर्धर आजाराला आमंत्रण देणारे फ्लोराईडयुक्त पाणी तुळशीची पाने व देठांचा वापर करून शुद्ध करण्याचा प्रयोग येथील राहुल कांबळे या प्राध्यापकाने यशस्वी करून दाखवला आहे.
First published on: 05-12-2013 at 01:08 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tulsi leaf best measures to specific fluorosis disease