तासगाव बाजारात क्विंटलमागे २ हजारांनी घसरण
दिगंबर शिंदे, सांगली</strong>
बदलत्या हवामानामुळे रंग बदलल्याने यंदा तासगावच्या बाजारात चिंचेचा दर क्विंटलला २ हजारांनी घसरला, मात्र अखाद्य असलेल्या चिंचोक्याचा दर मात्र १ हजार ८०० रूपये क्विंटलवर पोहचला आहे. दर उतरला असला तरी यंदाही चिंच बाजारातील उलाढाल ५० कोटींवर जाण्याची शक्यता बाजार समितीने व्यक्त केली आहे.
भारतीय खाद्य पदार्थामध्ये चिंचेला एरवी फारसे महत्त्व नसले तरी अन्य पदार्थातील तुरटपणा कमी करण्यासाठी गृहिणींकडून चिंचेचा वापर स्वयंपाकामध्ये हमखास केला जातो. चिंचेचा आंबटपणा अग्निमांद्य कमी करण्यासाठी आणि अरूची घालवण्यासाठी करावा, असा सल्ला आयुर्वेदात देण्यात आला आहे. तर पित्त विकारावर इमलीचा वापर हमखास करण्यासाठी वैद्यांकडून सल्ला दिला जातो. यामुळे आमटी-भाजीमध्ये चिंचेचा वापर करण्याची परंपरा आहे.
सध्या जिल्हयातील तासगाव बाजार समितीच्या आवारात चिंचेची आवक मोठय़ा प्रमाणात होत असून दर बुधवारी याठिकाणी सौदे होत आहेत. आजच्या सौद्याला चिंचेची आवक १५० क्विंटल झाली. या चिंचेला ७ हजारापासून ७ हजार ८०० रूपयापर्यंत क्विंटलला दर मिळाला. याचबरोबर चिंचा फोडून वेगळे केलेल्या चिंचोक्यांनाही बाजारात चांगला दर मिळत असून आजचा दर किलोला १८ रूपये म्हणजे क्विंटलला १ हजार ८०० रूपये दर मिळाला.
चिंचेसाठी सांगली जिल्ह्यात एकमेव बाजारपेठ म्हणून तासगाव कृषी उत्पन बाजार समितीची ओळख आहे. राज्यात चिंचेसाठी बार्शी, अहमदनगर व तासगाव या बाजारपेठा महत्त्वाच्या मानल्या जातात. तासगावच्या बाजारात सांगली, जत, कवठेमहांकाळ, कोकण, कोल्हापूर, विटा, मिरज आदी भागातून शेतकरी चिंच विक्रीसाठी बाजारात घेऊन येतात.
गुजरात राज्यात सध्या मोठी मागणी असल्याचे चिंचेचे जाणकार इस्माईल मुलाणी यांनी सांगितले. तसेच चालू महिनाअखेपर्यंत बाजारात मोठी आवक होणार आहे. त्यामुळे तासगावच्या बाजारात ५० ते ६० कोटींची उलाढाल यावर्षी होणार असल्याचे ते म्हणाले.
बाजार समितीचे सभापती अॅड. जयसिंग जमदाडे आणि सचिव चंद्रकांत सूर्यवंशी यांनी सांगितले, की तासगावच्या चिंच बाजारातून चिंचेची गतवर्षी ५ हजार ४२४ क्विंटल चिंचेची आवक झाली होती. गेल्या वर्षी चिंचेला ९ हजार ते ११ हजार रूपये दर मिळाला होता. चालू वर्षी आवक नेहमीप्रमाणे असली तरी चिंचेला असलेला फिकट लालसर उठावदार रंग नसल्याने दर ७ हजार ते ७ हजार ८०० रूपयापर्यंत घसरले आहेत. चालू वर्षी हवामान बदलामुळे काळपट लालसर रंग जादा आला आहे. या रंगाची चिंच टिकाऊपणात डावी ठरत असल्याने दर कमी मिळत आहे. तासगावच्या बाजारातून प्रामुख्याने आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ आणि गुजरात या राज्यात चिंचेची मागणी असल्याचे सूर्यवंशी यांनी सांगितले. भेळ तयार करण्यासाठी चिंचेचा वापर केला जातो. याशिवाय दक्षिण भारतात सार तयार करताना चिंचेचा मुक्तपणे वापर केला जातो.
चिंचोक्याचा वापर प्रामुख्याने स्टार्च आणि रंग निर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्रात होत असल्याचे सांगण्यात आले. या वर्षी चिंचोक्याला १८०० रूपये क्विंटलला दर मिळत आहे.