खुल्या बाजारात ‘रेशनिंग’पेक्षा २० रुपयांनी स्वस्त=
आयात डाळ बाजारात उपलब्ध झाल्याने सर्वच डाळींचे दर गडगडले आहेत. गेल्या वर्षी दोनशे रूपयांवर गेलेल्या तूरडाळीचा दर मंगळवारी ८० ते ९० रूपयांवर खाली आला आहे. यामुळे सध्या ‘रेशनिंग’पेक्षा खुल्या बाजारातच किलोला २० रुपयांनी तूरडाळ स्वस्त मिळू लागली आहे.
यंदाच्या हंगामात समाधानकारक पावसाने कडधान्य उत्पादन चांगले होईल अशी अपेक्षा आहे. याशिवाय कृषी विभागाने यंदा कडधान्य पेरणीला प्रोत्साहन दिल्याने पेरणीखालील क्षेत्रही दर वर्षीपेक्षा दहा ते वीस टक्क्यांनी वाढल्याने उत्पादनात वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आगाप पेरणी केलेल्या मूग, आळसूंद, मटकी याची काढणी सध्या सुरू असून काही माल बाजारातही येऊ लागला आहे. दुसरीकडे केंद्र शासनाने डाळ आयातीस परवानगी दिल्याने मोठय़ा प्रमाणात डाळीची आवक झाली असून देशांतर्गत असलेल्या दरापेक्षा आयात डाळीचे दर कमी आहेत. यामुळे बाजारपेठेतील गणिते एकदमच बदलली आहेत. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे. यामुळे सध्या बाजारात डाळीची मुबलक उपलब्धता निर्माण झाली असून याचे परिणाम डाळीचे दर गडगडण्यावर झाला आहे.
सांगली बाजार समितीतील डाळींचे व्यापारी विवेक शेटे यांनी सांगितले, की पावसाळी हंगामामुळे आणि डाळीला पर्याय उपलब्ध असल्याने देशांतर्गत बाजारात किरकोळ ग्राहकाकडून डाळीला अपेक्षित मागणी नाही. यामुळेही दरात घसरण झाली असून साठेबाज व्यापारीही दुहेरी कात्रीत सापडले आहेत.
चढय़ा दराने खरेदी केलेली डाळ व्यापाऱ्यांना सध्या कमी दराने विक्री करणे भाग पडत आहे. नवीन हंगामातील डाळीही येत्या पंधरा दिवसात बाजारात येतील, त्या वेळी आणखी दरात घसरण होण्याची शक्यता आहे.
दर घसरले
- आजच्या स्थितीला सांगली बाजारात देशी तूरडाळ ८० तर प्रेसिंडेंट तूरडाळीची ९० रूपये किलोने विक्री होत असून चणा डाळीचा दर १२० रूपयांवरून ७८ रूपयांवर घसरला आहे.
- मूग डाळीचा दर १२० वरून ६१ रूपये किलो खाली आला आहे. मसूर डाळीचा दर ८० वरून ६५ झाला असून वाटाणा डाळीचा दर ४० रूपये प्रति किलो आहे. हरभरा डाळीच्या दरातही मोठी घट झाली आहे.
- केंद्राने डाळ आयातीस परवानगी दिल्याने डाळीची आवक झाली आहे. नवे उत्पादन त्यातच या आयात डाळीची भर याच्या भीतीने व्यापाऱ्यांनीही आपली गोदामे खुली करण्यास प्रारंभ केला आहे.