राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी महात्मा गांधी यांचा हत्यारा नथुराम गोडसेवर आधारित चित्रपटात गोडसेची भूमिका केलीय. यावरून अमोल कोल्हेंवर टीकेची झोड उठली आहे. आता यावर गांधीजींचे पणतू तुषार गांधी यांनी आपली भूमिका मांडलीय. यात त्यांनी अमोल कोल्हे यांना अभिनेता म्हणून हवी ती भूमिका करण्याचं स्वातंत्र्य असल्याचं मत व्यक्त केलं. तसेच कितीही न आवडणारी भूमिका असली तरी संविधानाने दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपावं लागेल, असंही नमूद केलं. ते लोकसत्ता डॉट कॉमला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते.
तुषार गांधी म्हणाले, “अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली ती अभिनेता म्हणून केलीय. त्यांना त्याचं स्वातंत्र्य आहे. मी तर असं म्हणेन की त्यांना नथुराम आवडत असेल, त्यांचा आदर्श असेल तर तेही त्यांना स्वातंत्र्य आहे. जसं मला बापूंना मानायचं, भक्ती करायचं स्वातंत्र्य आहे. त्यामुळे कलावंत म्हणून अमोल कोल्हे यांनी जी भूमिका केली त्याला माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, एका खुन्याचं उदात्तीकरण करण्याचा जो काही प्रयत्न आहे त्याचा निषेध करायला हवा. तो आमचा अधिकार आहे.”
“कितीही न आवडणारं मत असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपूनच ठेवावं लागेल”
“आपल्या संविधानात अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. आपल्याला कितीही न आवडणारं मत असलं तरी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जपूनच ठेवावं लागेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर अंकुश ठेवण्याचा मी समर्थक नाही. नथुराम गोडसेच्या उदात्तीकरणाच्या या प्रयत्नांची मला भीती वाटत नाही, कारण याने बापूंचं काही नुकसान होईल असं वाटत नाही. बापूंना बदनाम करण्याचे आणि नथुरामचं उदात्तीकरण करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ७० वर्षांनंतरही बापूंच्या कामाचं महत्त्व कायम आहे हे आपण पाहतोय. त्यांना शेवटी नथुराम हत्यारा होता हे मान्यच करावं लागतं,” असं मत तुषार गांधी यांनी व्यक्त केलं.
“ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाडीचा प्रश्न लेखक, दिग्दर्शकांना विचारायला हवा”
नथुराम गोडसेवरील या चित्रपटात ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाड केल्याचाही आरोप होतोय. यावर बोलताना तुषार गांधी म्हणाले, “ऐतिहासिक तथ्यांशी छेडछाडीचा प्रश्न विचारायचा असेल तर तो ज्यांनी कथा लिहिली, दिग्दर्शन केलंय त्यांना विचारला पाहिजे. अमोल कोल्हे हे तर केवळ एक अभिनेता आहेत. त्यांना केवळ कॅमेरासमोर अभिनय करायचा असतो. त्यात त्यांची काही आस्था असेल असं वाटत नाही.”
“गोडसेचं उदात्तीकरण सुरू केल्यास हे त्यांच्या पक्षाचं मत आहे की त्यांचं हे विचारावं लागेल”
“जसा ‘मर्सीनेरी सोल्जर’ असतो, तो पैसे मिळतात म्हणून जाऊन लढतो, तसेच हे मर्सीनेरी अॅक्टर आहेत. त्यांनी गोडसेचं उदात्तीकरण सुरू केलं तर मग ते त्यांच्या पक्षाचं मत आहे की स्वतःचं हे विचारावं लागेल,” असंही तुषार गांधींनी नमूद केलं.
“अमोल कोल्हेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या आस्थेवर प्रश्न उपस्थित करू शकत नाही”
तुषार गांधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर म्हणाले, “अमोल कोल्हेंच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मान्यतेला नुकसान होतंय का याचा विचार राष्ट्रवादीला करायचा आहे. यावर काय पावलं उचलायची याचा अधिकार राष्ट्रवादी पक्षाला आहे. मात्र, अमोल कोल्हे यांच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आस्थेवर आपण काही प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकतो असं मला वाटत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला हे चुकीचं वाटत असेल तर त्यांनी जरूर कारवाई करावी.”
हेही वाचा : अमोल कोल्हेंच्या नथुराम गोडसेवरुन आव्हाडांचा इशारा; म्हणाले, “विरोध करणार, कलाकाराचा वेष घेऊन…”
“अमोल कोल्हे असं सांगत आहेत की त्यांनी ही नथुरामाची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याआधी केली होती. चित्रीकरण झालं तेव्हा ते खासदार नव्हते. असं असेल तर मग त्यांनी आता चित्रपट होतोय तेव्हा त्यांनी त्याची प्रसिद्धी करायला नको. तसेच चित्रपटात जे दाखवलं जातंय त्याचा निषेध करत त्याला माझी मान्यता नाही हे स्पष्ट करायला हवं,” अशी मागणी तुषार गांधी यांनी केली.