‘मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात’ यासारखे हळुवार गीत असो किंवा ‘मी मोर्चा नेला नाही मी संपही केला नाही’ यासारखे गीत किंवा ‘डिपाडी डिपांग’सारखे चित्रपट गीत; जीवनानुभव सच्चेपणाने मांडणारा आणि अनेक रसिकांच्या गळ्यातील ताईत असलेला युवा कवी संदीप खरे यंदाच्या दिवाळीमध्ये अनोखी भेट घेऊन येत आहे.
‘मौनाची भाषांतरे’ आणि ‘नेणिवेची अक्षरे’ या कवितासंग्रहांच्या यशानंतर युवकांचा लाडका कवी संदीप खरे याचा ‘तुझ्यावरच्या कविता’ हा नवा संग्रह शनिवारी (१० नोव्हेंबर) रसिकांसाठी खुला होत आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनतर्फे प्रकाशित या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ समीक्षक डॉ. द. भि. कुलकर्णी यांच्या हस्ते होणार आहे. बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास प्रसिद्ध कवी-गीतकार सुधीर मोघे, गायक-संगीतकार डॉ. सलील कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत. उत्तरार्धात संदीप खरे आणि सोनिया खरे हे या संग्रहातील कवितांचे वाचन करणार आहेत.
संदीपच्या कवितांसोबतच या संग्रहाची आगळीवेगळी निर्मितीमूल्ये आकर्षणाचा विषय ठरली आहेत. त्याला ‘तुझ्यावरच्या कविता’ हा संग्रहदेखील अपवाद नाही. संदीपच्या लेखणीतून साकारलेल्या विविध छटांच्या कवितांप्रमाणेच ‘प्रेम’ या भावनेइतक्याच तरलपणे संपूर्ण रंगीत कवितासंग्रहाची निर्मिती झाली आहे. एखादे चित्र वाटावे असे यातील प्रत्येक पान या प्रेमकवितांचा अनुभव अधिकच गहिरा करते. कविता आणि पुस्तकनिर्मिती ही फक्त तरुणाईलाच नव्हे, तर मराठी कवितेवर प्रेम करणाऱ्या प्रत्येकालाच सुखद अनुभूती देणारी ठरेल. प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांनी यासाठी मुखपृष्ठ केले आहे.    

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा