सावंतवाडीचे पोलीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल जाधव यांना २० लाख रुपयांच्या पैशांचे बंडल स्वीकारताना लाचलुचपत विभागाने सोमवारी रात्री अटक केली. पैशांना पावडर लावून ते स्वीकारताना लाचखोराना पकडले जाते, पण या प्रकरणात पैशाचे पॅकबंद केलेले बंडल विठ्ठल जाधव यांना एका हॉटेलात देण्यात आले. तेथेच रायगड लाचलुचपत पथकाने त्यांना पकडले आहे. त्यांना न्यायालयाने ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस उपविभागीय अधिकारी विठ्ठल अण्णा जाधव यांना सोमवारी रात्री एका हॉटेलमध्ये अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
रायगड लाचलुचपत उपअधीक्षक सुनील पुंडलीक करंगुटकर यांनी विठ्ठल अण्णा जाधव यांना रात्री अटक केली. त्यांच्या विरोधात पहाटे ४.३० वा. सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.
सावंतवाडी मोती तलावाशेजारी असणाऱ्या हॉटेलमध्ये त्यांच्यावर कारवाई  केली. शासकीय लोकसेवक नोकर या नात्याने दिलेल्या अधीकारपदाचा दुरुपयोग करून आर्थिक फायदा करून घेण्यासाठी श्रीमती शिल्पा बाळकृष्ण सातार्डेकर (रा. गोठोस-कुडाळ) हीने अनंत बळवंत मालवणकर यांचा भाऊ-बहीण विरोधात कल्याण कोर्टात दाखल केलेली तक्रार मागे घेण्याकरीता तडजोड करण्याचा प्रस्ताव जाधव यांनी दिला होता असे म्हणणे तक्रारदार यांचे आहे.
या प्रकरणी अनंत बळवंत मालवणकर यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती. शिल्पा सातार्डेकर यांच्याशी विठ्ठल जाधव यांनी हात मिळवणी करून  तिला भरपाई देण्याच्या बहाण्याने तक्रारीची तडजोड करण्याकरीता २० लाखाची मागणी केली. त्यातील १५ लाख श्रीमती सातार्डेकर हीला व पाच लाख विठ्ठल जाधव यांनी स्वत: करीता मागणी केली होती असे तक्रारदार याचे म्हणणे आहे.
या प्रकरणी तक्रारदार अनंत मालवणकर यांनी २० लाख रुपयांची रक्कम दिली नाही तर खोटय़ा केसमध्ये अडकवीण्याची धमकी विठ्ठल जाधव यांनी दिली होती. त्यामुळे अनंत मालवणकर यांनी रायगड लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली. त्यांनी पडताळणी करून २० लाख रुपये देताना सावंतवाडीत अटक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सिंधुदुर्ग लाचलुचपत उपअधिक्षक प्रदीप भानुशाली यावेळी हजर होते. संशयीताना रंगेहाथ पकडण्यापर्यंत रायगड उपअधीक्षक सुनील करंगुटकर यांनी उपस्थिती दर्शविली होती.
विठ्ठल जाधव हे पूर्वी सिंधुदुर्ग लाचलुचपत विभागात उपअधीक्षक होते. सध्या ते सावंतवाडी पोलीस उपविभागीय अधिकारी होते. ते ३१ मे ला सेवानिवृत्त होणार होते. या प्रकरणातील कल्याण मुंबईच्या तक्रारीच्या माध्यमातून माहीती अधिकारात केलेल्या अर्जामुळे जाधव यांचा संबध आला होता.
सावंतवाडी शहरातील मोती तलावाभोवती फेरफटका मारणाऱ्या विठ्ठल जाधव यांना अनंत मालवणकर यांनी हॉटेलमध्ये बोलावून घेतले. हॉटेलच्या आवारात सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या टेबलवर विठ्ठल जाधव बसले. समोर असणाऱ्या अनंत मालवणकर यांनी कागदाच्या पॅकेजमध्ये लपटलेले पिशवीतील एक बंडल त्यांच्यासमोर ठेवले. तेवढय़ात रायगड उपअधीक्षक सुनील करंगुटकर व सिंधुदुर्ग उपअधीक्षक प्रदीप भानुशाली यांनी त्यांना रंगेहाथ पकडले.
लाचलुचपत विभाग नोटांना पावडर लावून लाच घेणाऱ्यास स्वीकारण्यास देत असे पण या ठिकाणी सारा संशयच निर्माण करणारा ठरतो. चहाच्या टेबलावर ठेवलेले बंडल नेमके कशाचे आहे हे नंतर कळले. त्यामुळे २० लाखांची लाच स्वीकारण्याचा प्रसंग जनतेत चर्चीला जात आहे.
दरम्यान सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगांवकर यांनी संशयास्पद प्रकरणी सखोल चौकशी व्हावी तसेच सार्वजनिक ठिकाणी एवढी मोठी रक्कम स्वीकारणारा आणि देणारा कसा काय देणार? असा प्रश्न उपस्थित केला आहे. उगाच कोणीही बळीचा बकरा होऊ नये म्हणून कायद्याच्या रक्षकानी सखोल चौकशी करावी अशी मागणी केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा