काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांचे ट्विटर खाते बंद केल्यानंतर आता अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षासह देशभरातील काँग्रेसचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांची ट्विटर खाती बंद करण्यात आली आहेत. ट्विटरची ही कारवाई पक्षपातीपणाची असून केंद्रातील मोदी सरकारला जाब विचारणारे ट्विट करून जेरीस आणल्यामुळेच मोदी सरकारच्या दबावाखाली ट्विटरने ही कारवाई केली असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या कारवाईचा काँग्रेस पक्ष निषेध करत असून कोणत्याही दबावापुढे न झुकता लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी काँग्रेस पक्ष आवाज उठवतच राहिल, असे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
ट्विटरच्या कारवाईवर बोलताना पटोले म्हणाले की, “केंद्रातील मोदी सरकार लोकशाही व्यवस्था व संविधानाला न जुमानत हुकूमशाही पद्धतीने कारभार करत असून केंद्र सरकारच्या विरोधातील प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न मागील ७ वर्षापासून सातत्याने केला जात आहे. संविधानाने आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. अन्याय, अत्याचार दिसेल त्याविरोधात आम्ही आवाज उठवत आलो आहोत व यापुढेही आवाज उठवत राहु. काँग्रेस पक्ष मोदी सरकारच्या अन्यायी कारभाराचे वाभाडे काढत होते तेच त्यांना अडचणीचे ठरल्याने कारवाई केली आहे. भाजपाचे नेते वारंवार समाजात तेढ निर्माण करणारे, फुट पाडणारे, देशविघातक संदेश ट्विटरवरून देत असताना त्यांच्यावर कारवाई करण्याची हिम्मत ट्विटर करत नाही. मात्र थातुरमातूर कारणे देऊन काँग्रेसच्या शेकडो ट्विटर खात्यांवर कारवाई करण्यात आली हा पक्षपातीपणा आहे.”
“ट्विटरने अखिल भारतीय काँग्रेस पक्ष, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्ष, मुंबई काँग्रेस, विधिमंडळ पक्षनेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, जितेंद्र सिंह, महिला काँग्रेसच्या सुष्मिता देव, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आ. भाई जगताप, प्रदेश सरचिटणीस व सोशल मीडियाचे अभिजित सपकाळ यांच्यासह काँग्रेसची शेकडो खाती बंद केली आहेत. ट्विटरने कितीही खाती बंद केली तरी संविधानाने दिलेले अभिव्यक्ती स्वातंत्र्य व काँग्रेसचा विचार तळागाळापर्यंत पोहचवण्यापासून कोणीही रोखू करु शकत नाही,” असेही पटोले म्हणाले.
ट्विटरकडून गेल्या आठवड्यात काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं होतं. त्यानंतर गुरुवारी सकाळी ट्विटरनं काँग्रेसच्या अजून काही नेतेमंडळींची अकाऊंट्स लॉक केल्यानंतर आता थेट काँग्रेस पक्षाचंच मुख्य अकाऊंट ट्विटर इंडियानं लॉक केलं आहे. दरम्यान, ट्विटर इंडिया मोदी सरकारच्या दबावाखाली हे काम करत असल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. या पार्श्वभूमीवर ही कारवाई गोपनीयता आणि वैयक्तिक सुरक्षेसाठी करण्यात आली आहे असं स्पष्टीकरण ट्विटरनं दिलं आहे.