केंद्रीय अंमलीपदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नावावर रेस्टॉरंट आणि बारचा परवाना असल्याचा आणखी एक गौप्यस्फोट राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी शुक्रवारी केला. गुरुवारी सायंकाळीच मलिक यांनी आपण उद्या पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केलं होतं. याच पार्श्वभूमीवर समीर वानखेडे यांच्या पत्नीने शुक्रवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ट्विटरवरुन नवाब मलिक यांना टोला लगावला होता. क्रांतीने केलेल्या या टीकेवर नवाब मलिक यांची मुलगी निलोफर मलिक-खानने रिप्लाय केला होता. या दोघींमध्ये ही पत्रकार परिषद सुरु होण्याआधीच ट्विटर वॉर पहायला मिळाली.
नक्की वाचा >> वाशीमधील ‘त्या’ बारचे मालक आपणच असल्याचं सांगत समीर वानखेडे म्हणाले, “मी २००६ पासूनच…”
नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी वाशीमधील सद्गुरु बार आणि रेस्ट्रॉचा परवाना समीर वानखेडेंच्या नावे असणारं सूचक ट्विट केलं होतं. त्यानंतर समीर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने ट्विटरवरुन खोचक शब्दामध्ये ट्विट केलं होतं. “वा काय दहशत आहे. झोपताना, उठताना, बसताना नवाब काका केवळ समीर वानखेडेबद्दल विचार करतात. सकाळ झाली नाही की ट्विट सुरु. भीती निर्माण करावी तर अशी. ही एका इमानदार अधिकाऱ्याची ताकद आहे,” असं क्रांती ट्विटमध्ये म्हणाली.
क्रांतीने ९ वाजून ३९ मिनिटांनी केलेल्या या ट्विटला अर्ध्या तासाच्या आत नवाब मलिक यांची मुलगी निलोफरने ट्विटरवरुनच रिप्लाय दिला. क्रांतीचं ट्विट कोट करुन रिट्विट करत निलोफरने त्यावर कमेंट दिली. “भीती त्यांना असते ज्यांनी छळ आणि कपटीपणा केला असतो. पर्दाफाश होण्याच्या भीतीने सुरु असणारी ही तडफड बंद करा याचा काहीच उपयोग होणार नाही,” असं निलोफरने म्हटलं.
दरम्यान, मलिक यांनी आपल्या पत्रकार परिषदेमध्ये वानखेडेंवर टीका केली. बारचा परवाना वानखेडेंच्या नावे असल्याचं सांगत केंद्रीय सेवेत असताना इतर कोणताही व्यवसाय करता येत नाही, या नियमाची वानखेडे यांनी सरळसरळ पायमल्ली केल्याचं मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांचे वडील राज्य उत्पादन शुल्क विभागात काम करत असताना १९९७मध्ये वानखेडे यांच्या नावावर रेस्टॉरंट आणि बारचा परवाना घेतला होता. ३ लाख १७ हजार ६५० रुपये भरून त्यांनी २०२२ पर्यंत त्याचे नूतनीकरण करण्यात आल्याचे मलिक यांनी सांगितले. वास्तविक पाहता १८ वर्षांखालील कुणालाही मद्यविक्री किंवा बारचा परवाना दिला जात नाही, असा नियम असताना समीर वानखेडे यांचे वय १७ वर्षे १० महिने १९ दिवस असताना त्यांच्या नावावर परवाना देण्यात आला होता. त्याआधारे १९९७ पासून आजपर्यंत त्यांचा नवी मुंबईत बार सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.
मलिक यांच्या या आरोपांवर उत्तर देताना, माझ्या मालकीचा बार असल्याचे छायाचित्र मला बदनाम करण्याच्या उद्देशाने समाज माध्यमांवर प्रसारीत करण्यात आले असून ते छायाचित्र माझ्या बारचे नाही. मी सेवेत असल्यापासून कोणताही व्यवसाय करत नाही, असे वानखेडे म्हणाले.