राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचं ट्विटर हँडल सस्पेंड करण्यात आलं आहे. दोन दिवसांपासून हे ट्विटर हँडल सस्पेंड असल्याचा संदेशही या ट्विटर हँडलवर दिसतो आहे. शरद पवार गटाने या ट्विटर हँडलच्या विरोधात तक्रार केल्यानंतर ट्विटरकडून ही कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार यांनी २ जुलै २०२३ ला शिंदे फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. NCPSpeaks शरद पवार गटाचं अधिकृत ट्विटर हँडल आहे. तर NCPSpeaks1 या नावाने अजित पवार गटाने ट्विटर हँडल सुरू केलं होतं. जे सस्पेंड करण्यात आलं आहे.
ट्विटरने हँडल सस्पेंड करण्याचं नेमकं काय कारण दिलं आहे?
अजित पवार गटाने नियमांचं उल्लंघन केल्याने ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरने सांगितलं आहे. ट्विटर अकाऊंट सस्पेंडेड असा मेसेज या ट्विटर अकाऊंटवर दिसतो आहे. दुसरीकडे आज हे ट्विटर हँडल सुरु होईल अशी माहिती अजित पवार गटाने दिली आहे.
२ जुलैला अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविरोधात बंड पुकारलं. अजित पवार गट थेट सत्तेत सहभागी झाला. अजित पवारांसह सत्तेत गेलेल्या आमदारांना मंत्रिपदही मिळाली. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवार यांच्या मनधरणीचे प्रयत्नही सुरु केले होते. मात्र शरद पवार यांनी आपण भाजपासह जाणार नाही ही भूमिका घेतली आहे. आता पुढे भाजपाची आणि अजित पवारांची रणनीती काय असणार? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.