महाराष्ट्राला ज्या प्रमाणात केंद्राकडून लसपुरठा होणे अपेक्षित आहे, तेवढ्या प्रमाणात लसपुरवठा होत नसल्याने आजही राज्यात पूर्ण क्षमतेने लसीकरण होऊ शकत नाही. चार हजाराहून जास्त लसीकरण केंद्रे असली तरी हजारापेक्षा जास्त लसीकरण केंद्रे रोज बंद ठेवावी लागतात. केंद्राकडून पुरेसा लससाठा मिळत नसल्याने आजही जवळपास अडीच कोटीहून अधिक लोकांचा लसीचा दुसरा डोस घेण्याचे बाकी आहे. यात ३ लाख ४३ हजार आरोग्य सेवक तर ८ लाख ४६ हजार आघाडीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. दरम्यान आज सायंकाळी सहापर्यंत ६ लाख आठ हजार लोकांना लसीकरण करण्यात आल्यामुळे राज्यात लसीकरण झालेल्यांची संख्या पाच कोटी पार झाली आहे.
करोना लसीचा दुसरा डोस घेणाऱ्यांना लोकल प्रवासाला राज्य सरकारने परवानगी दिली आहे. तसेच हॉटेल- रेस्टॉरंट, जिम आदी रात्री दहापर्यंत सुरु ठेवण्यासाठी काही नियम करून परवानगी दिली आहे. यामुळे करोना वाढण्याची भीती तज्ज्ञांना वाटत असून करोनाच्या तिसऱ्या लाटेला अटकाव करण्यासाठी अनेक नियमांबरोबर किमान ७० टक्के लोकांचे लसीकरण झाले पाहिजे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राची बारा कोटी लोकसंख्या तसेच ६३ लाखाहून अधिक करोना बाधित रुग्ण आणि जवळपास १ लाख ३५ हजार करोना मृत्यू लक्षात घेऊन, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे २ जुलै आरोग्य मंत्रालयाला पत्र लिहून दीड कोटी जादा लसींचे डोस देण्याची मागणी केली होती. मात्र ऑगस्ट महिन्यासाठी केंद्राकडून केवळ एक कोटी २० लाख लस डोस देण्याचे केंद्राने जाहीर केले. महाराष्ट्रात चार हजार लस केंद्रांच्या माध्यमातून आम्ही रोज १२ ते १५ लाख लोकांचे लसीकरण करण्याची तयारी ठेवून आहोत. ही क्षमता गरजेनुसार वाढवू शकतो. मात्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळणारा लस साठा लक्षात घेऊन आम्हाला नियोजन करावे लागते. परिणामी आमची लसीकरणाची पूर्ण क्षमता आम्हाला वापरता येत नाही, असे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
चार हजाराहून अधिक लसीकरण केंद्रांची आमची तयारी असताना १५ ऑगस्ट रोजी १०४९ सत्रांच्या माध्यमातून २०६१६३ लसीकरण झाले. १४ ऑगस्ट रोजी ४०८७ सत्रांमधून ९ लाख ६४ हजार लसीकरण झाले. मात्र त्यापूर्वी १० ऑगस्ट ते १३ ऑगस्ट या काळात एक लाख ८० हजार ते तीन लाखाच्या आगेमागे रोज लसीकरण होत होते. यातून १५ ऑगस्ट रोजी राज्यात ४ कोटी ९४ लाख १८ हजार ४०१ लोकांचे राज्यात लसीकरण झाले होते, तर आज १६ ऑगस्ट रोजी सहा लाख आठ हजार लोकांचे लसीकरण होऊन महाराष्ट्राने पाच कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. तथापि हा वेग पुरेसा नसल्याचे आरोग्य विभागाच्या उच्चपदस्थांचे म्हणणे आहे.
केंद्राकडून मिळणारा लस पुरवठा लक्षात घेता महाराष्ट्रातील ७० टक्के लोकांचे लसीकरण होण्यास किती काळ लागेल? हे सांगणे कठीण आहे. तिसरी लाट, डेल्टाची भीती कायम आहे. निर्बंध शिथील केल्याने करोनाचे रुग्ण पुन्हा वाढतील ही भिती प्रशासनाला वाटते, तर अर्थचक्राची वाट लागल्याने व्यापारी वर्ग कमालीचा अस्वस्थ झाला आहे. त्यामुळे करोना लसीचे जादा डोस मिळण्याची राज्याची मागणी आहे. मात्र केंद्राकडून पुरेशा प्रमाणात लस मिळत नसल्याने १५ ऑगस्ट रोजी २ कोटी ५७ लाख ५१ हजार ३४५ लोक लसीचा दुसरा डोस मिळण्याच्या प्रतिक्षेत आहेत. १८ ते ४४ वयोगटातील पहिला डोस घेतलेल्यांची संख्या १ कोटी ४२ लाख आहे, तर दुसरा डोस मिळालेल्यांची संख्या केवळ ११ लाख ६३ हजार ६२५ एवढी आहे. ४५ वयोगटावरील एक कोटी ८९ लाख लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला, तर या वयोगटातील ९४ लाख ३१ हजार ८८७ लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. अडीच कोटी लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला नसताना, मुंबईसह राज्यात हॉटेल- रेस्टॉरंट सह दुकाने व अन्य व्यवहार खुला केल्याचा फटका बसणार का? हा कळीचा मुद्दा बनला आहे.