अलिबाग– रसायनी जवळ वावेघर येथे बंदूक आणि काडतूसे घेऊन जाणाऱ्या दोघांना रसायनी पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून सिंगल बोरची बंदूक आणि पाच काडतूसे जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी रसायनी पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
रसायनी पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई विशाल पाटील आणि गृहरक्षक दलाचे जवान बांगर या दोघांना बीट मार्शल म्हणून नियुक्ती देण्यात आली होती. दोघेही रविवारी पाहटे गस्तीवर होते. यावेळी पहाटे दीडच्या सुमारास वावेघर येथील इंडीयन ऑइल पेट्रोल पंपाचे मागील ग्राऊंडवरून दोघांना मोटार सायकल मुख्य रस्त्याचे बाजुकडे जोरात येतांना दिसली. त्यामुळे दोघांनी मोटर सायकलवीरल दोघांना थांबवून त्यांच्याकडे विचारपूस सुरू केली. मात्र दोघांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला. त्यांनी मोटरसायकवर असलेल्या दोघांकडे असलेल्या बॅग मध्ये काय आहे. विचारणा केली. मात्र त्यांनी बॅग देण्यास नकार दिला.
त्यामुळे पोलीसांचा संशय अधिकच बळावला. त्यांनी तात्काळ पोलीस निरीक्षक संजय बांगर यांना घटनास्थळी बोलावून घेतले. पोलीस निरीक्षक बांगर आपल्या इतर सहकाऱ्यांसह तिथे दाखल झाले. त्यांनी दोन पंचांच्या समक्ष मोटर सायकल वरील दोघांच्या बॅगची झडती घेतली. तेव्हा त्यात एक सिंगल नळी बंदुक आणि प्लॅस्टिकचे आवरण असलेले १२ एम.एम. बोअरची जिवंत काडतुसे आढळून आली.त्यामुळे पोलीसांनी भालचंद्र दत्तात्रेय शिद आणि कल्पेश रामचंद्र वाघ, दोन्ही रा. वार्दोली तारटेप ठाकुरवाडी, ता. पनवेल यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांचे वाहनही जप्त केले आहे. दोघांविरोधात रसायनी पोलीस ठाणेया भारतीय शस्त्र अधिनियम चे कलम ३, २५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा. पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.