जालना : घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील प्रभू श्रीराम आणि अन्य पंचधातूंच्या मूर्ती चोरीप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. चोरीस गेलेल्यापैकी पाच मूर्तीचा समावेश असलेली राम पंचायतनची मूर्ती पोलिसांनी हस्तगत केली आहे. अन्य मूर्ती हस्तगत करण्यासाठी पोलीस आणखी एका आरोपीच्या शोधात आहेत. समर्थ रामदास ज्यांची पूजा करीत असत त्या या मूर्ती असल्याने राज्य विधिमंडळ अधिवेशनातही या संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आला होता.
जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी या संदर्भात माध्यम प्रतिनिधींना माहिती दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी शेख राजू शेख हुसेन हा मूळ कर्नाटकातील असून सध्या त्याचे वास्तव्य उस्मानाबाद येथे आहे, तर दुसरा आरोपी महादेव शिवराम चौधरी (ओतारी) हा सोलापूर जिल्ह्यातील वैराग (ता. बार्शी) येथील आहे.
या मूर्ती चोरीप्रकरणी सव्वादोन महिन्यांपूर्वी २२ ऑगस्ट रोजी घनसावंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. जांबसमर्थ येथील राममंदिर (देववाडा) २१ ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजता बंद केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी स्वच्छतेसाठी गेलेले पुजारी व व्यवस्थापक धनंजय देशपांडे यांना मूर्ती चोरी झाल्याचे आढळून आले होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शिंदे यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याची जबाबदारी स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविली होती. त्यानुसार स्थापन केलेल्या वेगवेगळय़ा पथकांनी औरंगाबाद, बीड, परभणी, नांदेड, उस्मनाबाद, सोलापूर, कोल्हापूर, अहमदनगर, मुंबई, बुलढाणा इत्यादी जिल्ह्यांसह कर्नाटक राज्यात या गुन्ह्याचा तपास केला. गुप्त बातमीदारामार्फत तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आणि पोलिसांकडे नोंद असलेल्या आरोपींकडून माहिती घेऊन या गुन्ह्याचा शोध घेण्यात आला.