तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर काम करणारा बिहारमधील ठेकेदार निरूल सरदार अन्साही यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली असून, अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.
अटक केलेल्यांमध्ये अण्णा भागवत कोटुळे (रा. तळीपिंपळगाव, ता. पाटोदे) आणि शत्रुघ्न बन (रा. हातवळण, ता. आष्टी) या बीड जिल्हय़ातील दोघांचा समावेश आहे. त्यांना दि. १३ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश येथील प्रथम न्यायदंडाधिकारी महादार यांनी दिला. पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण व उपनिरीक्षक अजित चिंतले यांनी या दोघांना अटक केली. या प्रकरणी गोरख कल्याण बारडकर (रा. बारडगाव, ता. कर्जत) यालाही संशयित म्हणून अटक करण्यात आली आहे. अंबालिका साखर कारखान्यात निरूल सरदार अन्साही हा ठेकेदार तीन वर्षांपासून फॅब्रिकेशनचे काम करीत आहे. दि. १८ एप्रिलला रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास त्याचे अपहरण करण्यात आले होते. एका जीपमधून आलेल्या काही इसमांनी मारहाण करून त्याला बळजबरीने जीपमध्ये बसवून पळवून नेले होते. दोन दिवसांपूर्वीच त्याला कामाची मोठी रक्कम मिळाली होती. सुमारे तीन दिवस त्याला मारहाण करीत फिरवण्यात आले.
तीन दिवसांनी एका ढाब्यावर अन्साही याने जीपसह पलायन करून शिताफीने स्वत:ची सुटका करून घेतली. तो नगर तालुक्यात आला असता लोकांनी त्याला पोलिसांकडे नेल्यानंतर या प्रकाराचा उलगडा झाला. पोलिसांनी अटक केलेल्या दोघांमधील कोटुळे हा त्या जीपचा मालक आहे. या गुन्हय़ात आणखी त्यांना दोघे सहभागी होते. त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. पकडलेल्या दोघांनी पोलिसांकडे अपहरणाची कबुली दिली असून त्यांनी इतरही बरीच माहिती दिली आहे.
दोघांना अटक, १३ पर्यंत पोलीस कोठडी
तालुक्यातील अंबालिका कारखान्यावर काम करणारा बिहारमधील ठेकेदार निरूल सरदार अन्साही यांचे खंडणीसाठी अपहरण करण्यात आले होते. या अपहरणकर्त्यांच्या मुसक्या अखेर पोलिसांनी आवळल्या.
First published on: 11-05-2014 at 03:17 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two arrested police custody till