सोलापुरातील लोकमंगल उद्योग समूहाअंतर्गत लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने यंदाच्या वर्षांपासून लोकमंगल साहित्य पुरस्कार दिला जाणार आहे. उत्कृष्ट साहित्यनिर्मितीसाठी दोन साहित्यिकांना तसेच साहित्य चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तीलाही लोकमंगल पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. येत्या डिसेंबरमध्ये हे पुरस्कार वितरित केले जाणार असल्याची माहिती लोकमंगल उद्योग समूहाचे संस्थापक, आमदार सुभाष देशमुख यांनी एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठी साहित्याचा दर्जा आणखी वाढावा, प्रतिभावंत साहित्यिकांची कदर व्हावी म्हणून लोकमंगल संस्थेने दरवर्षी साहित्य पुरस्कार देण्याचा निर्णय घेतल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. मराठी कादंबरी, कथासंग्रह, काव्यसंग्रह, विनोदी, वैचारिक, समीक्षा, ललित आदी साहित्य प्रकारांसाठी लोकमंगल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने संबंधित साहित्यिकांकडून प्रस्ताव न मागविता स्वत:हून शोध घेऊन पुरस्कार दिले जाणार आहेत, असे त्यांनी नमूद केले. यात दरवर्षी दोन साहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रत्येकी २१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असेल. याशिवाय स्वत:कडून उल्लेखनीय साहित्यलेखन झाले नसले तरी साहित्य चळवळीसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना स्वतंत्र पुरस्कार दिला जाणार आहे. ११ हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप राहणार असल्याचे आमदार देशमुख यांनी सांगितले. पाचजणांची पुरस्कार निवड समिती आणि दहा सदस्यांची साहाय्य समिती असेल, अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी दिनकर देशमुख, शोभा बोल्ली, अनिता ढोबळे, ॠचा कांबळे, राजशेखर शिंदे, डॉ. रणधीर शिंदे, अमृता कल्याणी आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा