रत्नागिरी: दोन दुचाकी समोरा समोर धडकून झालेल्या अपघातात दोघाही दुचाकीस्वारांचा मृत्यु झाला. हा अपघात मुंबई गोवा महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील तूरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोर सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास झाला.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूरज राजाराम फडकले (वय २८, रा. तुरळ, हरेकरवाडी) हा आपल्या ताब्यातील होंडा युनिकॉर्न दुचाकी(एम एच०८ एएम६९६४) घेऊन तुरळ येथून आरवलीकडे जात होता. तसेच संदेश सखाराम भोजने (वय ४०, रा. धामापूर ओसेवाडी) हा आपल्या ताब्यातील ज्यूपीटर दुचाकी (एमएच ०८ बीए ७१६२) घेऊन आरवली येथून तुरळ येथे जात असताना मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावरील तुरळ हरेकरवाडी स्मशानभूमी समोर दोन्ही दुचाकी समोरासमोर जोरात धडकून अपघातात घडला.
दोन दुचाकी समोरासमोर धडकून झालेल्या अपघातात संदेश सखाराम भोजने याचा अपघातस्थळीच मृत्यू झाला. तर सूरज राजाराम फडकले याचा संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याची माहिती संगमेश्वर पोलिसांनी दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच दोघांचे मृतदेह शवविच्छेदनानंतर नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.