सांगली : शेतमजुरीचे काम संपवून दुचाकीवरून घरी परतत असताना अज्ञात वाहनाने ठोकरल्याने दोन शेतमजुरांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सांगली-तासगाव मार्गावर शुक्रवारी रात्री घडली.
तासगावपासून तीन किलोमीटर अंतरावर कवठेएकंद गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात दुचाकीवरील बाबासो शिवाजी पाटील (वय ६६ रा. कांचनपूर, ता. मिरज) व अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील (वय ५३ रा. काकडवाडी, ता. मिरज) हे दोघेजण ठार झाले आहेत.
दोघे शेतमजूर असून ते तासगांव परिसरात शेतातील कामाची सुटी झाल्यानंतर सायंकाळी दुचाकीवरून (एम एच १० सी डब्ल्यू ४७५९) गावी परतत होते. तासगांव – सांगली रोडवर कवठेएकंद गावच्या हद्दीत तुळजाई कोल्ड स्टोअरेज नजीक ही दुचाकी आली असता एका अज्ञात वाहनाने या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यामध्ये बाबासो पाटील व अशोक उर्फ पोपट पाटील हे दुचाकीवरून उडून रस्त्यावर पडले. त्यामध्ये त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले.
अपघातात दुचाकीचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. अपघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहनासह पसार झाला. अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ, पोलीस उपनिरीक्षक अविनाश घोरपडे, सुरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघा शेतमजूरांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजताच काकडवाडी व कांचनपूर येथे शोककळा पसरली होती.