सोलापूर : घरगुती वादातून तसेच दारूच्या व्यसनातून पतीने आपल्या पत्नीचा खून करून नंतर स्वतः आत्महत्या केल्याचे दोन प्रकार सोलापूर जिल्ह्यात घडले. करमाळा तालुक्यातील कोर्टी आणि बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे हे दोन प्रकार घडले.

करमाळा तालुक्यातील कोर्टी येथे युवराज लक्ष्मण शेरे (वय ३१) याने घरगुती वादातून झालेल्या कडाक्याच्या भांडणात आपली पत्नी रूपाली (वय २७) हिचे तोंड दाबून तिचा खून केला आणि नंतर स्वतः छतावरील लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. युवराज हा पत्नी रूपाली व दीड महिन्याच्या मुलीसह आई-वडिलांसोबत घरात राहत होता. घटनेच्या दिवशी दुपारी आई-वडील व अन्य मंडळी पाहुण्याकडे कार्यक्रमासाठी गेली असता इकडे घरात युवराज, त्याची पत्नी रूपाली व मुलगी हे तिघे होते.

दरम्यान, दोघा पती-पत्नीमध्ये वाद होऊन तो टोकाला गेला. त्यातून रागाच्या भरात युवराज याने रूपाली हिचे तोंड दाबले. त्यामुळे श्वास रोखून तिचा मृत्यू झाला. नंतर युवराज यानेही आत्महत्या केली. दरम्यान, सायंकाळी आई वडील परतले असता घराचा दरवाजा आतून बंद दिसला. घरातून चिमुकल्या नातीचा रडण्याचा आवाज येत होता.

दार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने शेवटी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता रूपाली जमिनीवर निपचित पडली होती. तर युवराज हा छतावरील अँगलला गळफास घेऊन लटकलेला आणि चिमुकली नात आपल्या आईजवळ रडत असल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळाले. करमाळा पोलीस ठाण्यात मृत युवराजवर गुन्हा दाखल झाला आहे. दोन्ही मृत पती-पत्नीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

बार्शीत दुसरा प्रकार

बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) येथे दारूच्या नशेत पतीने केलेल्या मारहाणीत पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर घाबरलेल्या पतीने घरासमोर झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. वसंत अंबादास पवार (वय ५५) आणि सोनाबाई वसंत पवार (वय ४७) अशी या घटनेतील मृत दाम्पत्याची नावे आहेत.

वसंत पवार हा खेळणी विकण्याचा व्यवसाय करायचा. त्यास दारूचे व्यसन होते. दारू पिऊन तो नेहमी पत्नी सोनाबाई ऊर्फ आयनाबाई हिला मारहाण करीत असे. नेहमीप्रमाणे त्याने पत्नीला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केली. यात डोक्याला आणि तोंडाला जबर मार लागल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. नंतर वसंत यानेही घरासमोरील बदामाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी वैराग पोलीस ठाण्यात मृत वसंत याच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे.