जिल्ह्य़ात डेंग्यूच्या आजाराने पुन्हा डोके वर काढले असून, एकाच दिवसांत दोन बालकांचा डेंग्यूने बळी घेतला. याच आजाराने परळी, माजलगाव व आष्टी तालुक्यांत पाच जणांचा बळी घेतला होता.
आरोग्य यंत्रणा मात्र डेंग्यूच्या साथीवर नियंत्रण मिळवण्यास कुचकामी ठरत असल्याने बळींची संख्या वाढत असताना जनतेत भीतीचे वातावरण पसरले आहे.
सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांत जिल्ह्य़ातील माजलगाव, परळी, धारूर, आष्टी, वडवणी तालुक्यांत तापाच्या रुग्णांची संख्या अचानक वाढली. रक्त तपासणीत डेंग्यूच्या आजाराने बळी गेल्याचे स्पष्ट झाल्यानंतर नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. आरोग्य विभागाने दखल घेऊन जिल्ह्य़ातील यंत्रणा सतर्कतेचे आदेश दिले आहेत.
गेवराई तालुक्यातील राजापूर येथील जुबेरखाँ शेरखाँ (वय ४) या मुलाला डेंग्यूचा आजार झाल्याने उपचारासाठी औरंगाबाद येथे दाखल केले होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. केज तालुक्यातील नांदूरघाटक येथील अनिकेत विष्णू भोसले (वय ५) यालाही डेंग्यूची लागण झाली होती. खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ताप मेंदूपर्यंत गेल्याने त्याचाही मृत्यू झाला.   

Story img Loader