सांंगली : गेल्या वर्षीच्या गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी कृष्णा नदीच्या पात्रात गेलेली दोन मुले गुरुवारी सायंकाळी बेपत्ता झाली असून, एकाला वाचविण्यात यश आले. शुक्रवारी दिवसभर शोध मोहीम राबवूनही मुलांचा शोध लागला नाही. पाण्याला वेग असल्याने शोधकार्यात अडचणी येत आहेत.

शिवाजी मंडईजवळील वाल्मिकी गणेश उत्सव मंडळाच्या गणेश मूर्तीची वर्षभरानंतर नवीन मूर्ती आणण्यापूर्वी गतवर्षीच्या मूर्तीचे विसर्जन करण्याची प्रथा आहे. या प्रथेनुसार मंडळातील कार्यकर्ते विसर्जनासाठी मूर्ती घेऊन सरकारी घाटावर गेले होते. परतत असताना तिघेजण पाण्याच्या प्रवाहात अडकले. यापैकी एका मुलाला वाचविण्यात यश आले. मात्र, आदित्य अजय रजपूत (वय १६) आणि अक्षय मनोज बनसे (वय १४) हे दोघे प्रवाहातील पाण्यात अडकून बुडाले. ही घटना गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

हेही वाचा – गणरायाच्या स्वागतासाठी सांगली नगरी सज्ज; गणेशमूर्ती, पूजासाहित्य, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी गर्दी

हेही वाचा – सांगली : विवाहितेवर अत्याचार; दोघांविरुद्ध गुन्हा

बेपत्ता मुलांची शोध मोहीम बचाव पथकाने सुरू केली. मात्र, अंधार पडल्यानंतर थांबविण्यात आलेली शोध मोहीम आज पुन्हा सुरू करण्यात आली. सांगलीतील सरकारी घाटापासून हरिपूर संगमापर्यंत दोन्ही मुलांचा शोध घेतला. मात्र, सायंकाळपर्यंत त्यांचा शोध लागलेला नव्हता.