नागपूरमध्ये गुरुवारपासून सुरू होत असलेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या दोघांकडे उत्तेजक द्रव्य असलेली इंजेक्शन सापडल्याने खळबळ उडाली. स्पर्धेत सहभागी होण्यापूर्वी उत्तेजक द्रव्ये घेण्याचा दोन्ही स्पर्धकांचा प्रयत्न होता, अशी माहिती उघड झाली आहे. या दोन्ही स्पर्धकांची नावे अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्यांना स्पर्धेतून बाद करण्यात आल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.
नागपूरमधील चिटणीस पार्क मैदानावर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी संध्याकाळी स्पर्धेचे औपचारिक उदघाटन करण्यात येणार आहे. तत्पूर्वी सकाळी प्राथमिक फेरीपूर्वी स्पर्धकांचे साहित्य तपासले जात असताना दोघांकडे उत्तेजक द्रव्य असलेली इंजेक्शन सापडली. आयोजक समितीचे सदस्य दीपक खिवरकर यांनीच या दोन्ही स्पर्धकांना पकडले आणि त्याबद्दल समितीतील पदाधिकाऱ्यांना माहिती दिली. यानंतर ही दोन्ही इंजेक्शन ताब्यात घेण्यात आली असून, या दोन्ही स्पर्धकांना या स्पर्धेतून बाद करण्यात आले असल्याची माहिती मिळते आहे.
महाराष्ट्र केसरी या राज्यातील प्रतिष्ठेच्या स्पर्धेतही स्पर्धकांकडून उत्तेजक द्रव्यांचे सेवन केले जात असल्याचा प्रकार उघड झाल्यामुळे क्रीडाप्रेमींनी धक्का बसला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा