सोलापूर : राज्य शासनाने हाती घेतलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्याच्या अनुषंगाने आवश्यक दाखले आणि अर्ज भरण्यासाठी महिलांची अलोट गर्दी होत असताना महा-ई-सेवा केंद्र म्हणून मान्यता नसताना काही नेट कॅफेचालकांनी महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी धंदा मांडला आहे. याप्रकरणी प्रशासनाने दोन नेट कॅफेचालक व मालकांविरूध्द गुन्हे दाखल केले आहेत.
सात रस्ता भागातील प्रगती नेट कॅफे आणि योगेश्वर नेट कॅफे अशा दोन ठिकाणी उत्तर सोलापूर तहसील कार्यालयातील मंडल अधिकारी सरिका कल्याण वाव्हळ यांनी खातरजमा केली असता तेथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरून घेताना कोणतेही शुल्क आकारणे अपेक्षित नसताना महिलांकडून शंभर रूपये ते दोनशे रूपयांची रक्कम उकळली जात असल्याचे आढळून आले.
हेही वाचा…सांगली : पावसाचे पुनरागमन, वारणा दुथडी भरून वाहिली; चांदोली धरणात ४६ टक्के पाणीसाठा
महा-ई-सेवा केंद्र म्हणून अधिकृत मान्यता नसताना या दोन्ही नेट कॅफेंमध्ये घडत असलेला प्रकार शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करणारा असल्यामुळे त्याबद्दल तात्काळ फौजदारी कारवाई करण्यात आली. सदर बझार पोलीस ठाण्यात संबंधित दोन्ही नेट कॅफेचालक व मालकांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.